बॉलिवूडमधील अनेक बड्या सुपरस्टार्सचे असे काही चित्रपट आहेत, जे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेत. यातलाच एक चित्रपट म्हणजे मोहेंजोदडो. उत्तम संवाद आणि दमदार अॅक्शन असलेला ‘ग्रीक गॉड’ अर्थात अभिनेता हृतिक रोशनचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला होता. चित्रपटाचा निर्मिती खर्चही वसूल झाला नव्हता.
ऐतिहासिक विषयाला वाहिलेला हा चित्रपट होता. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक रोशनसोबतत पूजा हेगडे मुख्य भुमिकेत होते. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी खूप संशोधन केले होते. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी वेगवेगळ्या वास्तुविशारद, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकारांना भेटून त्या काळातील तपशील मिळविण्यासाठी तीन वर्षे घालवली. त्यानंतर त्यांनी 300 पानांची चित्रपटाची कथा फायनल केली होती. 300 पानांची स्क्रिप्ट वाचण्यासाठी खूप वेळ लागत असल्याची माहिती खुद्द हृतिक रोशनने एका मुलाखतीत दिली होती.
तिन वर्षांचे संशोधन आणि 300 पानांची स्क्रिप्ट तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करु शकला नव्हता. या चित्रपटासाठी 115 कोटी रुपये खर्च आला होता. तर चित्रपट केवळ 108 कोटी रुपये कलेक्शन जमा करु शकला. या चित्रपटासाठी हृतिक रोशनची फी 68 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर हृतिक रोशन दीपिका पादुकोण, अनिल कपूर आणि अक्षय ओबेरॉय यांच्यासोबत 'फाइटर'मध्ये दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. 'फाइटर' हा देशातील पहिला एरियल अॅक्शन फ्रँचायझी चित्रपट आहे. दरम्यान, हृतिक रोशनने अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याने २००० साली ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि रातोरात तो प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याचा डॅशिंग लूक आणि डान्सिंग स्टाइलवर लाखो तरुणी घायाळ होतात.