2016 मध्ये कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद माध्यमांमध्ये चांगलाच गाजला होता. दोघांनीही एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत एकमेकांचा खरा चेहरा उघड करण्याचा प्रयत्न केला होता. पुढे तर हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता. आता पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हृतिकला समन्स बजावत, उद्या 27 फेब्रुवारीला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तूर्तास याच प्रकरणावरून कंगनाने हृतिकला डिवचले आहे.कंगनाने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये कंगनाने पुन्हा एकदा हृतिकला ‘सिली एक्स’ (मूर्ख एक्स बॉयफ्रेन्ड) म्हटले आहे.
काय केले ट्विट
दुनिया कहां से कहां पहुंच गई मगर मेरा सिली एक्स अभी भी वहीं है, उसी मोड पे... जहां ये वक्त दोबारा लौट के नहीं जाने वाला...., असे डिवचणारे ट्विट कंगनाने केले आहे.
काय आहे प्रकरण?2016 मध्ये ‘सिली एक्स’ याच शब्दावरून कंगना व हृतिक एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. एका मुलाखतीत कंगनाने हृतिकला ‘सिली एक्स’ म्हटले होते. यानंतर हृतिकने कंगनाला अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली होती. कंगनानेही या नोटीसला उत्तर देत हृतिकला २१ पानांची नोटीस बजावली होती. यानंतर दोघेही एकमेकांवर बेछूट आरोप करत सुटले होते. सर्वात आधी हृतिकने ट्विटरला आपल्यात आणि कंगनामध्ये कोणतेही प्रेमसंबंध नव्हते असा खुलासा केला होता. यानंतर त्याने कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवत सार्वजनिकपणे माफी मागण्याची मागणी केली होती. कंगनाने माफी मागण्यास नकार देत, 2014 मध्ये आमच्या प्रेमसंबंध होते असा दावा केला होता.
हृतिकचे आरोप1. कंगनाने मला 1439 ईमेल पाठवले होते. यापैकी ब-याच ईमेलकडे मी दुर्लक्ष केले. हे सर्व ईमेल व्यक्तिगत, अभद्र भाषेत लिहिलेले होते.२. कंगना ही Aspergers Syndromeने ग्रासलेली आहे. यामुळे ती कल्पनेत जगते. कल्पना रंगवते.
कंगनाचे आरोप1. हृतिकनेच माझ्याशी बोलण्यासाठी खास ईमेल आयडी तयार केला होता. हृतिक व सुझानचे नाते, त्यांच्यातील घटस्फोट याबाबत हृतिकने अनेकदा माझ्याशी वेगवेगळ्या गोष्टी शेअर केल्या होत्या. मी दिवसाला 50 ईमेल पाठवायची,असा हृतिक दावा करतो. असे असेल तर एकूण 601 दिवसांत माझ्याकडून हृतिकला 30 हजार ईमेल मिळायला हवेत. पण हृतिकने माझ्याकडून 1439९ ईमेल मिळाल्याचा दावा केला आहे. यावरूनच त्याचे दावे किती खोटे आहेत, हे कळते.2. मी नाही तर हृतिक स्वत: मानसिक रूग्ण आहे.या वादाच्या सरतेशेवटी हृतिकने आपल्या नावाचा वापर करून बनावट ईमेल खाते तयार करून त्याद्वारे अभिनेत्री कंगना राणौतशी संवाद साधण्यात आल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून सायबर पोलिसांनी तपास सुरू केला होता.