‘रंग दे बसंती’ (Rang De Basanti) हा सिनेमा प्रदर्शित होऊन 15 वर्षे झालीत. पण या सिनेमाशी संबंधित किस्से आजही चर्चेत असतात. असाच एक पडद्यामागचा किस्सा चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा (Rakesh Omprakash Mehra) यांनी सांगितला आहे. आपल्या ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ या आत्मचरित्रात त्यांनी एक खुलासा केला आहे. या चित्रपटासाठी करण सिंघानियाच्या भूमिकेसाठी अनेक बडे स्टार्स मेकर्सची पहिली पसंत होते. अगदी हृतिक रोशनलाही (Hritik Roshan) ही भूमिका ऑफर केली गेली होती. खास म्हणजे, हृतिकने ही भूमिका करावी, अशी खुद्द आमिरचीही (Aamir Khan) इच्छा होती. इतकंच नाही तर आमिर स्वत: हृतिकशी मनधरणी करायला त्याच्या घरी गेला होता.
दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ या आत्मचरित्रात ‘रंग दे बसंती’शी संबंधित अनेक किस्से लिहिले आहेत. ते लिहितात, ‘रंग दे बसंती या सिनेमातील करण सिंघानियाच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्याला घ्यावं, याचा निर्णय फार कठीण होता. या भूमिकेसाठी फरहान अख्तर, अभिषेक बच्चनपासून हृतिक रोशनपर्यंत अनेकांना विचारलं गेलं होतं. पण या सर्वांनी ही भूमिका करायला नकार दिला होता. सर्वप्रथम आम्ही फरहानजवळ गेलो होतो. पण त्यानं ही भूमिका करायला नकार दिला. कारण त्यावेळी तो एक तरूण दिग्दर्शक होता आणि कदाचित त्यावेळी स्वत:ला अभिनेता म्हणून बघत नव्हता. मी त्याला या भूमिकेची ऑफर दिली, तेव्हा त्यालाच आश्चर्याचा धक्का बसला होता. अभिषेक बच्चन यानेही ही भूमिका स्वीकारली नाही. मग मी आमिरशी याबद्दल बोललो. तू हृतिकशी बोलून बघ, असं त्याला म्हणालो. आमिर हृतिकच्या घरीही गेला. चांगला चित्रपट आहे, करून घे, अशा शब्दांत आमिरनं हृतिकशी मनधरणी केली होती. पण तो काही मानला नाही. अखेर आम्ही साऊथ स्टार सिद्धार्थला साईन केलं. सिद्धार्थचा बॉईज हा तामिळ सिनेमा आम्ही पाहिला होता. ’
अजय राठोडच्या भूमिकेसाठी शाहरूख... चित्रपटातील फ्लाईट लेफ्टनंट अजय राठोडच्या भूमिकेसाठी शाहरूख खानला ऑफर दिल्याचा खुलासाही राकेश यांनी केला. लेफ्टनंट अजय राठोडच्या भूमिकेसाठी शाहरूखला साईन करण्यासाठी मी अमेरिकेपर्यंत गेला होतो. अमेरिकेत शाहरूख स्वदेश सिनेमाचं शूटींग करत होता. पण शाहरूखकडे तारखा नव्हत्या. तो प्रचंड बिझी होता. म्हणून त्यानं ही भूमिका करायला नकार दिला होता. त्यानंतर आम्ही आर. माधवनला या भूमिकेसाठी साईन केलं होतं, असं त्यांनी सांगितलं आहे.