बॉलिवूड (bollywood) अभिनेता हृतिक रोशन (Hrithik roshan) सध्या एका जाहिरातीमुळे अडचणीत आला आहे. झोमॅटोची जाहिरात करणं (Zomato Ad Controversy) हृतिकला महागात पडलं असून त्याच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकच नाही तर हृतिक आणि झोमॅटो कंपनीला या प्रकरणी माफी मागण्यासही सांगण्यात आल आहे.
झोमॅटोने त्यांच्या एका जाहिरातीमध्ये उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा उल्लेख केला आहे. या जाहिरातीमध्ये हृतिक झळकला असून महाकालेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. सोबतच हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
काय आहे जाहिरात?
झोमॅटोच्या जाहिरातीमध्ये हृतिकने काही लहान-मोठ्या शहरांच्या नावाचा उल्लेख केला. मात्र यात त्याने उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा उल्लेख केला. ज्यामध्ये हृतिक फूड डिलीव्हरी बॉयकडून खाण्याचं पॅकेट स्विकारल्यानंतर बोलतो,''थाली खायचं मन केलं, उज्जैनमध्ये आहे, तर महाकालकडून मागून घेतलं'', असं हृतिक म्हणतो. त्याच्या या वाक्यावरुन हा नवा वाद निर्माण झाला आहे.
हृतिक आणि कंपनीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
ही जाहिरात पाहिल्यावर महाकलेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांनी हृतिक आणि झोमॅटो कंपनीला माफी मागण्यास सांगितलं आहे. ''जी कंपनी देशातील नागरिकांना शाकाहारीसोबत मांसाहारी अन्न घरपोच पोहोचवण्याची सेवा देते,त्यांना महाकालच्या नावाचा उल्लेख आपल्या जाहिरातीत करणं थांबवलं पाहिजे. अन्यथा पुजारी संघ पोलिसांकडे याची रीतसर तक्रार करेल. तसंच कंपनीनं हिंदू भावना दुखावल्या आहेत. आणि याचा आम्ही तीव्र निषेध करतो. कंपनीनं माफी मागितली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ'', असं महाकालेश्वर मंदिरातील पूजाऱ्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या वादग्रस्त जाहिरातीमुळे आता हृतिक रोशनच्या अडचणीत मात्र वाढ होऊ शकते. इतकंच नाही तर याचा परिणाम त्याच्या 'विक्रम वेधा' सिनेमावरही होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच हृतिकने 'लाल सिंग चड्ढा'ला पाठिंबा दिला होता. त्यावेळीही नेटकऱ्यांनी त्याच्या 'विक्रम वेधा'वर बहिष्कार घालू असं म्हटलं होतं.