बॉलिवूडमधील यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेला सिनेमा म्हणजे 'हम आपके है कौन ' (hum aapke hain kaun) . या सिनेमाला जवळपास २९ वर्ष उलटून गेली आहेत. मात्र, या सिनेमाची आणि त्यातील कलाकारांची क्रेझ अजुनही कमी झालेली नाही. हा सिनेमा टीव्हीवर लागल्यानंतर प्रेक्षक तितक्याच आवडीने तो पाहतात. या सिनेमामध्ये सिलिब्रिटींची मोठी तगडी स्टारकास्ट झळकली होती. त्यामुळे सहाजिकच या सिनेमाच्या सेटवरही अनेक किस्से घडले. हे किस्से अनेक कलाकारांनी सांगितले आहेत. त्यातलाच एक किस्सा अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सांगितला असून सध्या तो चर्चेत आला आहे.
या सिनेमात माधुरी आणि रेणुका या दोघींनी बहिणींची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे सेटवर सुद्धा त्या बहिणींप्रमाणेच वावरायच्या. परंतु, या सेटवर दोघींना एका मोठ्या समस्येला सामोरं जाव लागत होतं. त्यामुळे पूर्ण दिवसभर या दोघीही पाणी न पिता शुटिंग करायच्या. या विषयी रेणुका यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
"लोकांचा विश्वास बसणार नाही. पण, मी आणि माधुरी जेव्हा कुठे आऊट डोअर शूटसाठी जायचो त्यावेळी दिवसभर पाणी प्यायचो नाही. आजकाल निर्माते कलाकारांसाठी सगळ्या गोष्टींची सोय करुन देतात. पण, तो काळ तसा नव्हता. फार वेगळा होता. आता मागे वळून पाहिलं तर असं वाटतं ते दिवस किती कठीण होते. व्हॅनिटी व्हॅन नव्हत्या, वॉशरुम्स नव्हते. त्यामुळे आम्ही मुद्दाम पाणी प्यायचो नाही",असं रेणुका म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "आम्ही दोघी पाणीच पित नसल्यामुळे त्याचा परिणाम आमच्या आरोग्यावर, त्वचेवर होऊ लागला होता. माधुरीला तर याचा खूपच त्रास झाला. तिची खूप चिडचिड व्हायची. त्यानंतर तिने पाणी प्यायला सुरुवात केली. मग आम्ही सेटच्या आजुबाजूला काही जागा शोधल्या होत्या. या ठिकाणी ओढण्या वगैरे लावून मग आम्ही आमची सोय केली होती."
दरम्यान, 'हम आपके हैं कौन' हा सिनेमा त्याकाळी तुफान हिट झाला. या सिनेमात सलमान खान (salman khan), माधुरी दीक्षित (madhuri dixit), रेणुका शहाणे (renuka shahane) , अनुपम खेर, रीमा लागू( reema lagoo) , लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde) , प्रिया बेर्डे (priya berde) यांसारखी तगडी स्टारकास्ट झळकली होती.