Join us

जेव्हा सलमान खानला घेऊन गेले होते पोलिस, 'हम साथ साथ हैं'च्या सेटवर काय घडलेलं? अभिनेत्यानं केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 12:59 PM

'हम साथ साथ हैं' सिनेमाच्या सेटवर एक घटना घडली होती, ज्यावर अभिनेते महेश ठाकूर यांनी भाष्य केलं आहे. 

बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक महागड्या कलाकारांपैकी तो एक आहे. आजही जेवढं त्याचं फॅन फॉलोइंग आहे, तेवढंच ९० च्या दशकात होतं. सलमानने 'हम साथ साथ हैं' सह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'हम साथ साथ हैं' सिनेमाच्या सेटवर एक घटना घडली होती, ज्यावर अभिनेते महेश ठाकूर यांनी भाष्य केलं आहे. 

लोकप्रिय दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा 'हम साथ साथ हैं' सिनेमा १९९९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सलमान खान, सैफ अली खान, तब्बू आणि करिश्मा कपूर असा हा मल्टीस्टारर चित्रपट होता.  या सिनेमासोबत एक वाद निर्माण झाला होता. या  चित्रपटाच्या सेटवरुन पोलिस सलमानला घेऊन गेले आणि रात्रभर पोलिस ठाण्यात ठेवलं होतं, असा खुलासा चित्रपटात आनंद बाबूची भूमिका साकारणारा अभिनेता महेश ठाकूर यांनी केला आहे. 

महेश ठाकूर यांनी अलीकडेच सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'हा खूप वाईट अनुभव होता. आम्ही जोधपूरमध्ये एका गाण्याचे शूटिंग करत होतो. तेव्हा सेटवर काही पोलिस आले आणि त्यांनी सर्वांना उचलून पोलिस स्टेशनमध्ये नेलं. या संपूर्ण प्रकरणात मी, मोहनीश बहल, करिश्मा कपूर सहभागी नव्हतो. आम्ही जे पाहिलं आणि अनुभवलं ते चांगलं नव्हतं'.

ते पुढे म्हणाले, 'पोलिसांनी सलमान खान, सैफ अली खान, नीलम कोठारी, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांना सेटवरून नेलं होतं. महिलांना सोडण्यात आलं होतं. पण मला वाटतं सलमान भाई रात्रभर पोलिसांसोबत होते. त्यानंतर त्याचे भाऊ अरबाज आणि सोहेल त्यांना सोडवण्यासाठी आले. दुसऱ्या दिवशी, सलमान सेटवर परतला आणि त्याने चित्रपटाचे शूटिंग सुरू ठेवले. तो एक मस्त माणूस आहे. या प्रकरणाशी अनेक बड्या स्टार्सची नावे जोडली गेली होती.  मीडियाने खूप नकारात्मकता पसरवली पण शेवटी काहीच बाहेर आलं नाही'. 

टॅग्स :सलमान खानसेलिब्रिटीबॉलिवूड