Join us

'भूमिका लहान असली तरी..'; आलियाचं नाव घेत हुमा कुरेशीने केलं इंडस्ट्रीतील भेदभावावर भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 3:17 PM

Huma qureshi: नेमकं काय म्हणाली आहे हुमा?

'गॅग ऑफ वासेपूर', 'महारानी', 'मोनिका: ओ माय डार्लिंग' यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमामधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हुमा कुरेशी (huma qureshi). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर हुमाने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने इंडस्ट्रीमध्ये मानधनाच्या बाबतीत केल्या जाणाऱ्या भेदभावाविषयी भाष्य केलं आहे. सोबतच इंडस्ट्रीतला काही मोठ्या अभिनेता-अभिनेत्रींना सर्वात जास्त मानधन दिलं जातं. तुलनेने अधिक मेहनत घेणाऱ्या कलाकारांना किरकोळ मानधन मिळतं, असंही बेधडक वक्तव्य तिने केलं आहे.

अलिकडेच हुमाने 'ऑल अबाऊट ईव' या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने इंडस्ट्रीत कलाकारांसोबत होणाऱ्या भेदभावावर भाष्य केलं. "कलाविश्वात ही परंपराच चालत आलेली आहे. जो कलाकार जितका मोठा तितकी त्याची फी जास्त. मग तुमचा स्क्रीन टाइम किंवा तुमची भूमिका लहान असेल तरी याचा काही फरक पडत नाही", असं हुमा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "आलिया भट्ट एक उत्तम आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. मात्र, ती पात्रांचा विचार न करता जास्त फी घेण्याचा विचार करते. एखाद्या चित्रपटात तिची लहानशी भूमिका असेल तरी ती सगळ्यात जास्त मानधन घेते. मला वाटतंय गंगूबाई काठियावाडी मधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री तीच आहे."

दरम्यान, गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमासाठी १ रुपया मानधन घेणार असा दावा आलियाने केला होता. या सिनेमाने जवळपास १०० कोटींची कमाई केली आहे. हुमापूर्वी अनेक दिग्गज अभिनेत्रींनी मानधनात होणाऱ्या भेदभावावर भाष्य केलं आहे. यात क्रिती सेनॉन, करीना कपूर-खान, भूमी पेडणेकर या अभिनेत्रीने यावर भाष्य केलं आहे. यात काहींच्या मते, अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींना कमी मानधन दिलं जातं.

टॅग्स :बॉलिवूडहुमा कुरेशीआलिया भटसंजय लीला भन्साळीसेलिब्रिटी