Join us

हंगेरियन आर्टिस्टने ‘जजमेंटल है क्या’च्या मेकर्सवर लावला चोरीचा आरोप, जाणून घ्या काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 12:35 PM

आधी या चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेण्यात आला. यानंतर चित्रपटाच्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये कंगना व एका पत्रकाराचा वाद झाला. हा वाद ताजा असताना आता या चित्रपटाने आणखी एक वाद ओढवून घेतला आहे.

ठळक मुद्दे‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट गत शुक्रवारी प्रदर्शित झाला. तीन दिवसांत या चित्रपटाने 19.25 कोटींची कमाई केली.

कंगना राणौत आणि राजकुमार राव स्टारर ‘जजमेंटल है क्या’ची घोषणा झाली आणि हा चित्रपट चर्चेत आला. आधी या चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेण्यात आला. अखेर निर्मात्यांना ऐनवेळी चित्रपटाचे शीर्षक बदलावे लागले. यानंतर चित्रपटाच्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये कंगना व एका पत्रकाराचा वाद झाला. हा वाद ताजा असताना आता या चित्रपटाने आणखी एक वाद ओढवून घेतला आहे.होय, हेंगरीची एक फोटोग्राफर आणि व्हिज्युअल आर्टिस्ट फ्लोरा बोरसी हिने ‘जजमेंटल है क्या’च्या मेकर्सची पोस्टर चोरी करण्याचा आरोप केला आहे. ‘जजमेंटल है क्या’च्या एका पोस्टरमध्ये कंगनाच्या चेह-यावर एका काळ्या मांजरीचा चेहरा दिसतोय. हे पोस्टर चोरीचे असल्याचे फ्लोराचे म्हणणे आहे.

‘या चित्रपटाच्या पोस्टरने माझी कला चोरली. हे काय चाललेय, कुणी मला सांगेल का? हे कदापि योग्य नाही,’ असे फ्लोराने ट्वीटटरवर लिहिले आहे.

याशिवाय फ्लोराने राजकुमार रावचे एक ट्वीट रिट्वीट केले. यात कंगनाच्या चेह-यावर काळ्या मांजरीचा चेहरा असलेले पोस्टर शेअर केले गेले आहे. फ्लोराने लिहिले, ‘अरे हो, हे पाहून मला काही आठवले...अरे थांबा... जणू हे माझेच काम आहे.’

इतकेच नाही तर एका फेसबुक पोस्टमध्ये फ्लोराने चाहत्यांना तिच्या व कंगनाच्या पोस्टरमधील साम्य शोधण्याचे आवाहन केले.फ्लोरा म्हणते, त्यानुसार दोन्ही पोस्टरमध्ये साम्य आहे. आता या वादावर ‘जजमेंटल है क्या’ची निर्माती एकता कपूर व कंगना राणौत काय उत्तर देतात, ते बघूच. ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट गत शुक्रवारी प्रदर्शित झाला. तीन दिवसांत या चित्रपटाने 19.25 कोटींची कमाई केली.

टॅग्स :कंगना राणौतराजकुमार रावएकता कपूरमेंटल है क्या