Join us

रश्मिका मंदानासोबत काम देतो म्हणत लाखो रुपये उकळले, बॉलिवुड अभिनेत्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 4:30 PM

पिक्चरमध्ये काम देतो असं आमिष दाखवत फसवणारे काही कमी नाहीत.

पिक्चरमध्ये काम देतो असं आमिष दाखवत फसवणारे काही कमी नाहीत. हैदराबाद (Hyderabad) येथील एका बॉलिवूड अभिनेत्याला आणि त्याच्या पत्नीला नुकतीच अटक करण्यात आली आहे. या अभिनेत्याने पत्नीसोबत मिळून एका दांपत्याकडून लाखो रुपये लुटले आहेत. या दांपत्याच्या मुलाला टिव्ही जाहिरातींमध्ये बालकलाकाराची भूमिका देतो असं आमिष दाखवत अभिनेत्याने लाखो रुपये घेतले. 

साइबराबाद पोलिसांच्या माहितीनुसार, 'आरोपींनी रश्मिका मंदानासह अनेक टॉप कलाकार आणि क्रिकेटर्ससोबत प्रमोशनल व्हिडिओमध्ये मुलीला संधी देऊ असे आश्वासन दिले. आणि लाखो रुपये घेतले. ४७ वर्षीय अपूर्व दावडा उर्फ अरमान अर्जुन कपूर उर्फ डॉक्टर अमित आणि २६ वर्षांची नताशा कपूर उर्फ नाजिश मेमन उर्फ मेघना या नावाने आरोपींची ओळख झाली. या दोघांनी पीडित दाम्पत्याला १५ लाखांचा चूना लावला. याआधीही त्यांच्यावर असे आरोप झाले आहेत.'

पीडित दाम्पत्याने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तक्रार दाखल केली. आरोपींनी लहान मुलांच्या मॉडेलिंग असाईनमेंट्सच्या नावाखाली अनेक मॉल्समध्ये रॅम्प शोचे आयोजन केले. मुलांच्या मेकअप आणि आऊटफिटसाठी पैसे घेतले. काही पैसे परत देण्याची सुद्धा चर्चा झाली होती.

तक्रारदाराने सांगितले, 'मी माझ्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मॉलमध्ये गेले होते. इथेच मॉडिलिंग एजन्सीने माझ्याशी संपर्क केला. मुलीला रॅम्प वॉक करायला सांगितले. आणि नंतर अंतिम राऊंडसाठी पुन्हा रॅम्प वॉक असेल असे सांगितले. यासाठी साडेतीन लाख रुपये रिफंडेबल रक्कम जमा करायला सांगण्यात आलं. ६ दिवसांच्या फोटोशूटसाठी एकूण १४ लाख १२ हजार रुपयांची मागणी केली गेली.अभिनेत्री रश्मिका मंदाना सोबत बिस्कीटाच्या जाहिरातीचं शूट असेल असं कळवण्यात आलं. मी त्यांना १४ लाख रुपये दिले. 

या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १५ लाख ६० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय चार आयफोन आणि एक अॅपलचा लॅपटॉपही ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपी अपूर्व दावडा पुण्याचा असून त्याने तमन्ना भाटियाच्या 'चॉंद सा रोशन चेहरा' या सिनेमात भूमिका केली आहे.

टॅग्स :हैदराबाद प्रकरणपोलिसअटक