मी मुंबईत जन्मले. याच शहरात वाढले. मुंबई हे माझं घर आहे; म्हणून या मराठी पुरस्काराचं मोल माझ्यासाठी खूप आहे, अशी कृतज्ञ भावना व्यक्त करत ख्यातनाम अभिनेत्री कियारा अडवाणीने ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराचा स्वीकार केला. शेरशाह या गाजलेल्या चित्रपटातील भूमिकेसाठी कियाराला सन्मानित करण्यात आले. शुभ्र पेहरावात आलेली कियारा तिच्या साधेपणाने मोठी मोहक दिसत होती आणि बोलत- वागतही होती!
‘वर्षभरात बॉलिवूडला धक्के बसत असताना ‘शेरशहा’, ‘भूलभुलैय्या’ आणि ‘जुग जुग जियो’ हे तुझे तीन चित्रपट सुपरहीट ठरले, कसे वाटते आहे?’ असा प्रश्न ॠषी दर्डा यांनी तिला विचारला, तेव्हा गप्पांच्या ओघात कियारा म्हणाली, परमेश्वराची कृपा आणि प्रेक्षकांचं प्रेम!... ते असंच कायम राहू दे माझ्यावर!
‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी एक प्रश्न विचारून पेचात पकडले. दर्डा यांनी कियाराला प्रश्न केला, ‘समजा तुला राजकारणात प्रवेश करायचा असेल, तर तू कुणाच्या पक्षात जाशील?’- या थेट प्रश्नाने गडबडलेली कियारा हसून प्रश्न टाळण्याच्या बेतात होती, तोच प्रेक्षकात बसलेला तिचा सहकलाकार रणवीर सिंग तिच्या मदतीला धावला. खुर्चीतून उठून पुढे येत जोरजोराने हातवारे करत तो तिला सांगत होता, ‘आवाज नही आ रही है बोलो कियारा... माईक बंद पड गया, नीचे आ जाओ कियारा, सवाल में फंसना मत!’ त्यावर अवघे सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. शेवटी कियाराच म्हणाली, मी माझ्या अभिनयापुरतीच ठीक आहे!