अभिनेता सिद्धार्थ हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.कोरोना साथीवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी ट्विट केले होते. त्यानंतर त्याला तामिळनाडू भाजप सदस्यांकडून असे धमकवण्याचे कॉल येत आहेत. तामिळनाडू भाजप युनिटच्या सदस्यांनी त्यांचा फोन नंबर लीक केल्याचा आरोप त्याने केला आहे.
सोशल मीडियावर त्याने त्याच्यासह घडलेला प्रकार ट्विटच्या माध्यमातून खुलासा केला आहे. मला जीवे मारण्याच्या धमक्या दिले जात असल्याचे कॉल येत आहेत. गेल्या २४ तासांत ५०० हून अधिक कॉल त्याला आले असून यातून त्याला प्रचंड शिवीगाळही केल्याचे त्याने सांगितले. इतकेच नाही तर या सगळ्यांमागे तमिळनाडूमधील भाजपच्या आयटी सेलचा हात असल्याचा आरोप अभिनेत्याने केला आहे.
माझा नंबर लीक करण्यात आला आहे. फक्त मलाच नाही तर असे कॉल माझ्या कुटुंबातील सदस्यांनाही येत आहे. या सगळ्या नंबरची नोंद मी करुन ठेवली आहे. पोलिसांकडेही याबाबत तक्रार दाखल केली आहे. सिद्धार्थने त्याचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केले आहे. लोकांना माझ्यावर हल्ला करण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. आपण कोविड १९ बरोबरचे युद्ध जिंकूही पण अशा वृत्तीच्या लोकांपासून कसे सुरक्षित राहणार असा सवालही त्याने केला आहे. अशा कॉलमुळे मी घाबरलो असे अजिबात नाही. मी गप्प बसणार नाही, प्रयत्न करत राहणार आहे असेही सिद्धार्थने म्हटले आहे.