साऊथ स्टार सूर्याच्या ‘जय भीम’ ( Jai Bhim)या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. एकीकडे चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होतोय, दुसरीकडे चित्रपटावरून एक ना अनेक वादही निर्माण झाले आहेत. याच वादाच्या पार्श्वभूमीवर ‘जय भीम’चे संवादलेखक कन्मणी गुणशेखरन (Kanmani Gunasekaran) यांनी आपलं मानधन परत केलं आहे.
कन्मणी यांनी ‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत स्वत: ही माहिती दिली. शिवाय एक फेसबुक पोस्ट लिहित त्यांनी या चित्रपटातील वादग्रस्त दृश्यांवर नाराजी व्यक्त केली. मी दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाचे संवाद लिहिले. पण त्यातील वादग्रस्त दृश्यांची मला कल्पना नव्हती. तुम्ही माझा विश्वासघात केलाय, अशा शब्दांत त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.
दोन वर्षांपूूर्वी दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल यांनी कन्मणी यांना संवादलेखनासाठी विचारलं होतं. चित्रपटातील संवादात बरीच ग्रामीण भाषा असल्याने, कन्मणी यांना संवाद लेखन करण्यासाठी ऑफर दिली होती. कन्मणी यांनी दिग्दर्शकांच्या म्हणण्याप्रमाणे संवादलेखन केलं, मात्र कन्मणी यांच्या दाव्यानुसार, त्यांना चित्रपटातील वादग्रस्त कॅलेंडर दृश्याची तेव्हा कल्पना नव्हती. वन्नियार समुदायाने जय भीम या चित्रपटातील कॅलेंडर दृश्यावर आक्षेप नोंदवत अभिनेता सूर्याला कायदेशीर नोटीस बजावली आहे.‘वेन्नीयार संगम’नुसार जय भीम चित्रपटात दाखवलेल्या काही दृष्यांमुळे वेन्नीयार समुदायाची बदनामी झाली आहे. प्रतिमाहनन करणारी ही दृष्यं चित्रपटात मुद्दाम टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. जय भीमचे लेखक कन्मणी हे सुद्ध वेन्नीयार याच समुदायाचे आहेत. त्यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. कन्मणी म्हणाले..ओटीटी रिलीजमुळे दिग्दर्शकांनी वादग्रस्त दृश्ये तशीच ठेवली आणि त्यामुळे दोन समुदायांमध्ये वैमनस्य निर्माण झाला. चित्रपटासाठी मी Eli Vettai हे शीर्षक सुचवलं होतं. दिग्दर्शकानेही या नावाला होकार दिला होता. पण चित्रपटाची जाहिरात पाहिल्यावर Eli Vettai हे नाव बदलून चित्रपटाला Jai Bhim हे नाव देण्यात आल्याचं मला कळलं. चित्रपटातील व्यक्तिरेखांना कदाचित मुद्दाम नकारात्मक नाव देण्यात आली. वादग्रस्त दृश्य टाकून एका समुदायाच्या भावना दुखवल्या गेल्यात. याबद्दल आता तुम्ही माफी मागताये. पण त्याला अर्थ नाही. तुम्ही माझा विश्वासघात केलाय. पाठीमागून वार करणारी अशी लोकं भविष्यात कधीच भेटू नये. मी माझं 50 हजार रुपयांचा धनादेश परत पाठवत आहे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.