पणजी(गोवा): रविवारी गोव्यात 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI-2022) उद्घाटन झाले. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे वडील आणि 'बाहुबली', 'आरआरआर', 'बजरंगी भाईजान' आणि 'मगधीरा'सारख्या चित्रपटांसाठी कथा लिहिणारे केव्ही विजयेंद्र प्रसाद यांच्यासह सिनेविश्वातील अनेक सेलिब्रिटींचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी विजयेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या लिखानाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या.
या चित्रपट महोत्सवात विजयेंद्र प्रसाद यांनी "द मास्टर्स रायटिंग प्रोसेस" या विषयावर कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत त्यांनी अनेक भावी चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चित्रपटात क्षेत्रातील त्यांची सुरुवात आणि चित्रपटांसाठी लिखान कसे करावे, याबाबत टिप्स दिल्या. यावेळी त्यांनी बॉलिवूडची लेखक जोडी सलीम-जावेद आणि त्यांच्या 'शोले' चित्रपटाचे कौतुक केले. मी सलीम-जावेदचा खूप मोठा चाहता आहे. मी कॅसेट्स उधार घेऊन 'शोले' पुन्हा पुन्हा पाहिलाय, असे ते म्हणाले.
आपल्या लिखानाबाबत बोलताना ते म्हणाले की, आजही मी गोष्ट लिहितो, तेव्हा अनेकदा क्रिएटिव्ह ब्लॉकचा सामना करतो. मी 1988-1989 मध्ये लिहायला सुरुवात केली. तुम्हाला काहीतरी वेगळं तयार करायचं असेल, तर खोटं बोलावं लागेल. खोटं बोलणारा व्यक्ती एक चांगला कथाकार होऊ शकतो. मी कथा लिहित नाही, कथा चोरतो. मी आजुबाजूच्या कथा घेतो, जसे रामायण, महाभारत किंवा इतर खऱ्या घडलेल्या घटना घेतो आणि त्या गोष्टीत मांडतो. माझ्यामधून प्रेक्षकांमध्ये भूक निर्माण करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यामुळेच मला काहीतरी वेगळे आणि आकर्षक बनवण्याची प्रेरणा मिळते, असेही ते म्हणाले.