बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर हा 'एक व्हिलन 2' या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने गोव्यात जाण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, तारा सुतारीया आणि दिशा पाटनी यांच्याही भूमिका आहेत. दीपिका पादुकोणसोबतच्या ‘फायंडिंग फेनी’ या समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी अर्जुन शेवटचा गोव्यात गेला होता आणि आता मोहित सुरी या हाफ गर्लफ्रेंड चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत पुन्हा एकदा गोव्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी जाण्यासाठी अर्जुन उत्सुक आहे.
अर्जुन म्हणाला, “मोहितसोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी मी केव्हापासूनच वाट बघत होतो. हाफ गर्लफ्रेंडच्या चित्रीकरणाच्या वेळचा माझा अनुभव एक कालाकार म्हणून समृध्द करणारा होता. चित्रीकरणादरम्यान मला फारच मजा आली होती. माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट संगीत त्याच्यामुळे मला मिळाले आणि मी माझ्या मित्रमंडळींना आणि जवळच्या लोकांना नेहमीच सांगत असतो की आदित्य चोप्राशिवाय जर कोणी खरोखरच माझ्यावर विश्वास ठेवत असेल तर तो मोहित आहे. माझ्यावरील विश्वासामुळेच तो पुन्हा एकदा माझ्यासोबत काम करत आहे.”
तो पुढे म्हणाला, “ही एक अशी व्यक्ती आहे ज्याच्यासोबत काम करण्यासाठी एव्हरेडी असतो. कारण त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळते. मला पुन्हा एकदा नव्याने कामाला सुरुवात करायची आहे आणि इतक्या मोठ्या चित्रपटासाठी मोहितसोबत काम करण्याचा अनुभव मला घ्यायचा आहे. चित्रपटाचा सिक्वेल करणे, फ्रेंचाईज करणे आणि अनेक कलाकारांसोबत काम करणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. जॉन, मी, तारा, दिशा आणि अर्थातच दणदणीत संगीत यांना एक दिग्दर्शक या नात्याने त्याने एकत्र आणले आहे.”
अर्जुन सांगतो की तो त्याच्या दिग्दर्शकाचा चाहता आहे आणि मोहित त्याच्या संगीताने जी जादू करणार आहे त्यासाठी मी कमालीचा एक्सायटे आहे.तो म्हणाला, “तो ज्या प्रकारचे संगीत देणार आहे त्याची मी लहान मुलासारख्या उत्सुकतेने वाट बघत आहे. इश्कजादे आणि टू स्टेट्ससारखे चित्रपट मला मिळाल्याने मी नशीबवान आहे असेच नेहमी मला वाटते पण हाफ गर्लफ्रेंडचे संगीत- मग ते बारीश असो की फिर भी तुमको चाहुंगा असो- ते ऐकताना मला नेहमीच मी भाग्यवान असल्याची खात्री पटते.”
अर्जुन पुढे म्हणाला, “मी मोहित सुरीचा मोठा चाहता आहे. आवारापन हा माझ्या आवडीचा चित्रपट आहे. लोकांनी दुर्लक्षित केलेला हा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचे मी त्याला नेहमी सांगत असतो. ज्याच्यासोबत काम करावे असा तो एक मस्त माणूस आहे. विचाराने तो खूपच तरुण आहे. तुम्हालाही तो ते स्वातंत्र्य देतो आणि तरीही तो मुख्य प्रवाहात काम करतो. हा समन्वय खूप महत्त्वाचा आहे असे मला वाटते. त्याच्यासोबत पुन्हा काम करण्यासाठी मी आतुर आहे. प्रेक्षकांना नवे काहीतरी बघता-अनुभवता येईल अशी माझी अपेक्षा आहे.”