Join us

'मी मुंबई सोडली...', या प्रसिद्ध अभिनेत्यानं बॉलिवूड सोडून दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीकडे वळवला मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 7:01 PM

अनेक चित्रपटांमधील खलनायकी भूमिकांसाठी हा अभिनेता ओळखला जातो.

बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी अनेक चित्रपटात खलनायकी भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले. त्यांच्या चित्रपटाची आणि त्यातील अभिनयाची नेहमीच चर्चा होताना दिसते. ते सोशल मीडियावर सक्रीय असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचे व्लॉग करताना दिसतात. यामुळे त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. बॉलिवूडमध्ये इतकं काम करुनही आशिष विद्यार्थी यांच्यावर काम न मिळण्याची वेळ आली होती. याबद्दल नुकतेच त्यांनी खुलासा केलाय. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना साचेबद्ध  भूमिका मिळत होत्या, पण त्यांना काहीतरी वेगळे आजमावून बघायचे होते, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. यासाठी त्यांनी बॉलिवूड सोडून दाक्षिणात्य चित्रपटाक़डे मोर्चा वळवल्याचे सांगितले.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत आशिष विद्यार्थी म्हणाले की, १९९९ मध्ये जेव्हा लोक माझ्याकडे त्याच प्रकारच्या भूमिका घेऊन येऊ लागले आणि मला काहीतरी वेगळे करायचं होते. त्यावेळी मुंबई सोडायचा मी निर्णय घेतला आणि मी साऊथमध्ये काम शोधायला सुरुवात केली. मला पूर्णपणे काहीतरी वेगळे अनुभवायचे होते. सुदैवाने मला विक्रमबरोबर दिल हा चित्रपट मिळाला, तो चित्रपट सुपरहिट ठरला अन् मला तमिळ, तेलुगू, कन्नड अशा वेगवेगळ्या भाषांत काम मिळायला सुरुवात झाली.

पुढे ते म्हणाले, मी साऱ्या दाक्षिणात्य प्रेक्षकांचा आभारी आहे, त्यांनी मला ज्यापद्धतीने प्रेम आणि पाठिंबा दिला. २००० ते २०१३ मी तिथे खूप काम केले. तिथल्या लोकांनी मला आपलंसे केले. यासाठी त्यांचे मी खूप आभार मानतो. हिंदी चित्रपटसृष्टीत मात्र मला काम मिळेनासे झाले होते. मी साऊथ सिनेसृष्टीत गेल्यामुळे बऱ्याच लोकांनी मला कामासाठी विचारणेसुद्धा बंद केले. आशिष विद्यार्थी नुकतेच राणा दुग्गाबतीसोबत राणा नायडू या वेबसीरिजमध्ये झळकले. 

टॅग्स :आशिष विद्यार्थी