Join us  

आजही रात्री एकटं वाटतं, तिची आठवण येते!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 5:54 AM

मी पहिल्यांदाच अलाहाबादमधून खासदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो

ऑगस्ट हा माझ्या आईचा जन्मदिवस. तिचं नाव तेजी बच्चन. मी तिच्या तालमीतच तयार झालो. तिनेच माझी नाटकांशी, चित्रपटांशी आणि संगीताशी ओळख करून दिली. तिचा फॅशनचा सेन्स आणि तिची सौंदर्यदृष्टी या दोन्ही गोष्टी अतुलनीय होत्या. लाहोरमधल्या कॉलेजमध्ये काही काळ तिने शिकवलं होतं. त्यावेळी तिला बघण्यासाठी आणि तिनं लावलेलं परफ्युम फॉलो करण्यासाठी विद्यार्थी कॉरिडॉरमध्ये तिच्या येण्याची वाट बघत थांबलेले असत. ती जितकी कोमलहृदयी तितकीच प्रसंगी कणखरही होती. अनेक वेळा मी त्याचा अनुभव घेतला आहे.

मी पहिल्यांदाच अलाहाबादमधून खासदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो; पण काही कारणांनी माझं मन कच खात होतं. शेवटी मी तिच्याशी जाऊन सगळं मनातलं बोललो... हे सगळं मला नकोय! राजकारण हा माझा प्रांत नाही.. हे मला जमणार नाही.. मी नालायक ठरेन!..- एकतर निवडणूक तोंडावर आलेली होती; आणि मी असा वैतागून मागे फिरू पाहात होतो. मला सरळसरळ माघार घ्यायची होती, पक्षाशी बोलायचं होतं आणि बाहेर पडायचं होतं. माझे वडील म्हणाले, “ठीक आहे, आपण लगेचच परत जाऊ या.” पण, ती अतिशय बुलंद बाई होती. ती म्हणाली, “नाही! आपण थांबू या, जिंकू या, परत जाऊ या आणि मग यातून बाहेर पडायचं असल्याचं सांगू या.”आयुष्याविषयीची तिची असोशी संसर्गजन्य होती. केवळ मलाच या असोशीची लागण झाली असं नाही, तर तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला या असोशीची लागण होत असे. वास्तविक, आता तिला जाऊन बरीच वर्षं झाली आहेत; पण आम्ही राहिलेल्या शहरांमधल्या ज्या ज्या लोकांशी तिचा संपर्क आला, ते अजूनही तिच्यातल्या खानदानीपणाची आणि उत्साहाची आठवण काढतात. फळवाला, साडी दुकानदार... अक्षरशः प्रत्येक जण... आणि आत्ता आम्ही राहत असलेल्या शहरातच नाही, तर ज्या ज्या शहरांत आम्ही राहिलो, तिथं वातावरण उल्लासित करून टाकणाऱ्या तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगणारं कुणी ना कुणीतरी असतंच. राजकमल डिओच्या थिएटरमध्ये ‘दीवार’ची ट्रायल पाहताना ती अतोनात रडली होती आणि चित्रपट संपल्यानंतरसुद्धा कितीतरी तास तिचं सांत्वन करणं कुणालाच शक्य झालं नव्हतं. कदाचित तिने त्या वेळी पहिल्यांदाच माझ्या मृत्यूचा प्रसंग पाहिला होता. 

मी लहान असतानाची एक आठवण वडिलांनी आत्मचरित्रात लिहिली आहे. आजोबा आजारी असताना एकदा आईला अचानक कराचीला जावं लागलं. त्या वेळी मी तीन-चार वर्षांचा असेन. मला वडील आणि मदतनीस सुदामापाशी सोडून ती आजोबांना बघायला गेली. त्यावेळी रात्री वादळी पाऊस व्हायचा आणि विजा कडाडायच्या, तेव्हा मी तिच्या नावानं आक्रोश करत व्हरांड्यात जाऊन रडायचो....आजही मला रोज तिची आठवण येते आणि मी तिच्यासाठी मूकपणे आक्रोश करून रडतो. - संकलन : प्रतिनीधी 

टॅग्स :अमिताभ बच्चनमदर्स डे