करिश्मा कपूरने केवळ १७ व्या वर्षी प्रेम कैदी या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील करिश्माच्या अभिनयाला प्रेक्षकांची तितकीशी पसंती मिळाली नव्हती. त्यानंतर तिने पोलिस ऑफिसर, जागृती असे अनेक फ्लॉप चित्रपट दिले. पण जीगर या चित्रपटानंतर तिच्या करियरला एक वेगळी दिशा मिळाली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने राजा बाबू, अंदाज अपना अपना, कुली नं १, राजा हिंदुस्तानी, जुडवा, दिल तो पागल है, बिवी नं १ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.
२००६ मध्ये करिश्माने मेरे जीवन साथी या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर अनेक वर्षं ती अभिनयक्षेत्रापासून दूर राहिली. तिने डेन्जर्स इश्क या चित्रपटाद्वारे काही वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक केला होता. मात्र गेल्या सात वर्षांपासून ती कोणत्याच चित्रपटात झळकलेली नाहीये. त्यामुळे करिश्मा आता पुन्हा कोणत्या चित्रपटात दिसणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागलेली आहे. तिच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. अल्ट बालाजीच्या मेंटलहुड या वेबसिरिजद्वारे ती अभिनयक्षेत्रात पुनरागमन करत आहे. एका आईच्या आयुष्यात किती चढ-उतार येतात हे प्रेक्षकांना या वेबसिरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.
चित्रपटसृष्टीपासून करिश्माने दूर राहाण्यामागे एक खास कारण होते. तिची मुलं लहान असल्याने ती चित्रपटसृष्टीपासून दूर असल्याचे तिनेच एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे. ती सांगते, माझी मुले लहान असल्याने त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी मी हा निर्णय घेतला होता. पण आता अभिनयक्षेत्रात परतण्यासाठी मी खूप खूश आहे. माझ्या या नव्या इनिंगसाठी माझी मुलं तर खूपच उत्सुक आहेत. मी खूपच लहान वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. माझ्या कुटुंबातील सगळेच या क्षेत्रात आहेत. त्यांनी या क्षेत्राला अनेक वर्षांपासून आपले योगदान देखील दिले आहे.
करिश्माने वेबसिरिद्वारे अभिनय क्षेत्रात कमबॅक केल्यानंतर आता ती लवकरच चित्रपटात झळकेल अशी आशा करायला हरकत नाही.