बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सध्या सीबीआय तपास करत आहे. या प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजेच सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने नुकतेच इंडिया टीव्हीचे कंसल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांच्यासोबत बातचीत केली. त्यावेळी तिने आपल्या आरोपांचे खंडन करत म्हटले की, मी लढणार आणि जिंकणार. माझे सत्यच मला ताकद देते.
रियाने या मुलाखतीत सुशांत आणि तिच्या नात्यासोबत आरोपांबद्दल खुलासे केले. तिने सुशांतबद्दल सांगितले की, आतापर्यंत मी जेवढ्या लोकांना भेटले, त्यातील सुशांत सर्वात प्रामाणिक व्यक्ती होता. जेवढे प्रेम त्याने मला दिले त्याचा मला अभिमान वाटतो. आमची मैत्रीच्या आधारावर आमचे नाते होते. तुमच्या जीवनातील यश अपयश विसरून कोणी व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवतो. हे सगळे खूप भावते.
सुशांतच्या डिप्रेशनमुळे रिया त्याला सोडून गेली, असे बोलले जात होते. मात्र त्यावर रिया म्हणाली की, नाही.उलट त्याच्या डिप्रेशनमुळे मी जास्त जवळ आले. जेव्हा तुम्ही कोणाची काळजी घेता तेव्हा तुम्ही त्याची आई किंवा नर्स बनता. आपण त्याच्यावर निस्वार्थ प्रेम करू लागतो.
मी लढणार आणि जिंकणार. मला वाटते की हा विजय फक्त माझ्यासाठी नको उलट त्या प्रत्येक स्त्रीसाठी असावा जिला शिव्या दिल्या जातात. तिचा तिरस्कार केला जातो. कारण तिचे कुणावर तरी प्रेम होते आणि त्याच्यासोबत राहत होती.