‘इंडियन प्रो-म्युझिक लीग (आयपीएमएल)’ ही जगातील संगीत क्षेत्रातील अशा प्रकारची पहिलीच लीग असेल. क्रीडा क्षेत्राने आजवर अशा अनेक लीग पाहिल्या आणि अनुभविल्या असल्या तरी संगीतविषयक ही पहिलीच लीग आहे. या लीगमध्ये देशाच्या विविध भागांचे प्रतिनिधित्त्व करणारे सहा संघ असतील आणि ते एकमेकांशी सांगीतिक स्पर्धा करतील. हे संघ एकमेकांशी संगीताच्या क्षेत्रात स्पर्धा करतील. प्रत्येक संघाच्या कर्णधारपदी एक नामवंत पुरुष आणि एक महिला पार्श्वगायक असेल. शिवाय प्रत्येक संघात एका रिएलिटी कार्यक्रमाचा विजेता आणि एक होतकरू गायक असेल. या सहा विभागीय संघांचे कप्तानपद मिका सिंग, कैलाश खेर, साजिद खान, शान, अंकित तिवारी, जावेद अली, असीस कौर, भूमी त्रिवेदी, आकृती कक्कर, पायल देव, नेहा भसिन आणि शिल्पा राव या नामवंत गायक-गायिकांनी स्वीकारले आहे.
‘इंडियन प्रो-म्युझिक लीग’ या कार्यक्रमात मिका सिंगने सूत्रसंचालक करण वाही याच्याशी गप्पा मारल्या आणि आपण स्वत:साठी वधूचा शोध घेत आहोत, असे गंमतीत सांगितले. पण लग्नाबद्दल त्याची एक विशिष्ट अट असून तिचा थेट संबंध या कार्यक्रमाचा ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर सलमान खानशी आहे.
‘इंडियन प्रो-म्युझिक लीग’मध्ये ‘पंजाब लायन्स’चा कप्तान मिका सिंगने सांगितले, “मला लग्न करायचं असून त्यासाठी मी योग्य मुलीचा शोध घेत आहे. कदाचित ‘इंडियन प्रो-म्युझिक लीग’ कार्यक्रमादरम्यानच मला सुयोग्य नवरी सापडेलही, पण सलमान खानने लग्न केल्यानंतरच मी लग्न करणार आहे. ही माझी अट आहे. तोपर्यंत मी सिंगल जीवन मजेत जगणार आहे. साजिद भाईने आधी म्हटल्याप्रमाणे सलमान भाईनंतर बॉलीवूडच्या जगात केवळ मीच अविवाहित तरूण असेन. मला हे बिरूद जास्तीत जास्त काळ मिरवायचं आहे!”