एका अभिनेत्रीला कामाचे आमिष दाखवून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या चार जणांना मनसेने आपल्या स्टाईलने चांगलेच सरळ केले आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुकवर लाईव्ह करत या प्रकरणाची माहिती दिली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सापळा रचत ठाण्याचा घोडबंदर रोडवरील फॉर्म हाऊसवर संबंधित निर्मात्यांना घेरले आणि त्यानंतर त्यांना चांगलाच चोप देत अभिनेत्रीची सुटका केली
अमेय खोपकर यांनी फेसबुक लाइव्हवर सांगितले की, ''आज सकाळी आमच्या मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांना एका अभिनेत्रीने फोन केला. तिला काल एका कास्टिंग डिरेक्टरने फोन केला होता. तुला एका हिंदी चित्रपटात कास्ट केलेले आहे. पण जर तुला मुख्य भूमिका हवी असेल तर उद्या ते निर्माते लखनऊवरुन मुंबईत येणार आहेत. मात्र तुला त्यांच्यासोबत जाऊन त्यांना खूश करावे लागेल. तुला कॉम्प्रमाइज करावे लागेल. तरच तुला त्या मोठ्या सिनेमात रोल मिळेल. त्या मुलीने हिंमत दाखवली घरच्यांच्या कानावर सगळा प्रकार सांगितला. तिच्या घरच्यांनी मनसे चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांना हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर आमच्या महिला रणरागिणींनी त्या कास्टिंग डायरेक्टरचा पाठलाग केला. ज्या गाडीत त्या मुलीला कास्टिंग डायरेक्टर घेऊन जात होता त्याला मनसे सैनिकांनी ट्रॅप केले.
मनसे सैनिकांनी त्यांना चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत आहोत. त्यात एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी देखील आहे. अजून जर कुणाला या लोकांपासून त्रास झाला असेल तर त्यांनी लगेच आम्हाला संपर्क करावा’, असे आवाहन अमेय खोपकर यांनी केले.