गेली अनेक दशके रसिकांना असीम आनंद देणा-या चिरतरूण गायिका म्हणजे आशा भोसले. आपल्या गाण्यांइतक्याच आपल्या बिनधास्त स्वभावासाठीही त्या ओळखल्या जातात. नुकतेच आशा दींनी स्वत:चे एक डिजिटल चॅनल लॉन्च केले. या चॅनलवर आशा भोसले आपल्या आयुष्यातील अनेक घटना, अनेक मजेशीर किस्से शेअर करत असतात. अलीकडे एक असाच किस्सा त्यांनी शेअर केला. होय, आशा दीदी जर पुरूष असल्या तर त्यांनी काय केले असते तर एका अभिनेत्रीला चक्क पळवून नेले असते, याचा खुलासा यातून झाला.
आशा भोसले यांनी आपल्या करिअरमध्ये गतकाळातील अनेक अभिनेत्रींना आपला आवाज दिला. पण या सर्वांमध्ये एक अभिनेत्री आशा यांना सर्वाधिक आवडायची. त्या अक्षरश: तिच्यावर फिदा होत्या. इतक्या की, रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये अनेकदा गाणे विसरून त्या एकटक तिला न्याहाळत बसायच्या. ही अभिनेत्री कोण तर कॅब्रे क्वीन हेलन.
हेलनबद्दल आशा भोसले यांनी सांगितले, ‘हेलन कमालीची सुंदर होती. तिला पाहून जणू वेड लागायचे. अनेकदा माझ्या गाण्याचे रेकॉर्डिंग सुरु असायचे आणि हेलन यायची. मी गाणे विसरून वेड्यासारखी तिच्याकडे एकटक पाहात बसायचे. त्यामुळे रेकॉर्डिंग सुरू असेल तर तू स्टुडिओमध्ये येत जाऊ नकोस, अशी विनंती मी हेलनला केली होती. मी तिच्यावर जाम फिदा होते. इतके की, मी पुरूष असते तर तिला पळवून नेले असते. यापूर्वी अनेकदा माझ्या व हेलनबद्दल हा किस्सा ऐकवला गेला आणि तो खरा आहे.’आशा भोसले यांनी नुकतेच वयाच्या 86 व्या वर्षी स्वत:चे युट्यूब चॅनल सुरु केले.
का केले युट्यूबवर पदार्पण? माझ्या नातवंडांना इंटरनेटचा वापर करत काम करताना पाहत पाहत मी सुद्धा इंटरनेट शिकले. अनेकदा अनेकांनी मला माझे विचार, अनुभव लिहिण्याचा सल्ला दिला होता. पण तेव्हा माझ्याकडे पुरेसा वेळ नव्हता. आता मी घरीच आहे. त्यामुळे मी माझा 86 वर्षांचा अनुभव रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे. काही लोकांना तो आवडेल, काही लोकांना विचार करायला भाग पाडेल तर काही लोकांना हसू येईल, असे त्यांनी सांगितले होते.