सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. डेब्यूआधीच त्याने आपल्या चार्मिंग लूकने सर्वांना प्रेमात पाडलं आहे. बोनी कपूरची लेक खुशी कपूरसोबत (Khushi Kapoor) त्याचा 'नादानियां' सिनेमात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सने आगामी सर्व प्रोजेक्ट्सची घोषणा केली. यामध्ये 'नादानियां'चाही समावेश होता. आता नुकतंच सिनेमातील दुसरं गाणं रिलीज झालं आहे.
इब्राहिम अली खान आणि खुशी कपूरच्या 'नादानियां' मधील 'गलतफहमियाँ' हे दुसरं गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेलं हे गाणं तुषार जोशी आणि मधुबंती बागची यांनी गायलं आहे. हे एक sad song आहे. गाण्यात खुशी आणि इब्राहिमची केमिस्ट्री पाहायला मिळतेय. दोघंही एकमेकांपासून दूर झाले असून विरहाचं हे गाणं आहे. दोघांच्या अभिनयाची झलक यातून दिसतेय.
व्हिडिओवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.'मस्त अभिनय', 'पहिल्यांदाच यांना बघून चांगलं वाटत आहे', 'असली हिरो तर आता आला आहे' अशा कमेंट्स युजर्सने केल्या आहेत. इब्राहिम लूक्समध्ये तर अगदी सेम टू सेम सैफ अली खानसारखाच आहे. इब्राहिम आणि खुशीचा 'नादानियाँ' हा सिनेमा यावर्षीच नेटफ्लिक्सवर रिलीज होण्याची शक्यता आहे.
इब्राहिमचा हा पहिलाच सिनेमा असून त्याने याआधी करण जोहरसोबत काम केलं आहे. त्याच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात त्याने सहाय्यक दिग्दर्शनाचं काम केलं. तर खुशी कपूरचा हा तिसरा सिनेमा असणार आहे. याआधी ती नुकतीच 'लव्हयापा' मध्ये दिसली. याशिवाय 'द आर्चीज' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.