Join us

आयकॉनिक ‘बागबान’ ला पूर्ण झालीत 20 वर्षे; चित्रपटाचे भन्नाट किस्से एकदा वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 6:11 PM

'बागबान' चित्रपटाला आज प्रदर्शित होऊन 20 वर्षे झाली आहेत.

बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट येतात. अनेक चित्रपट प्रेक्षकांना आवडतात तर, काही चित्रपटांना प्रेक्षकांचे प्रेम मिळत नाही. परंतु, असे अनेक चित्रपट आहेत, जे प्रेक्षकांच्या प्रेमाने आयकॉनिक बनलेत. असाच एक चित्रपट म्हणजे 'बागबान'. अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री हेमा मालिनी स्टारर 'बागबान' चित्रपटाला आज प्रदर्शित होऊन 20 वर्षे झाली आहेत. हा चित्रपट 2003 मध्ये याच दिवशी प्रदर्शित झाला होता. दिवंगत रवी चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खानही छोट्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री लोकांना आवडली होती. शिवाच चित्रपटाली सर्वंच गाणी तर हीट झाली होती. 

हेमा मालिनी यांनी या चित्रपटाचा एक किस्सा शेअर केला होता. जेव्हा हेमा मालिनी  यांना पहिल्यांदा  'बागबान' चित्रपटाची ऑफर आली, तेव्हा त्यांनी नकार दिला होता. चार मोठ्या मुलांच्या आईची भूमिका साकारण्यासाठी त्या तयार नव्हत्या. पण, आईच्या सांगण्यावरून हेमा मालिनी यांनी या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी होकार दिला होता. शिवाय, असेही म्हटले जाते की, अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्यातील केमिस्ट्रीमुळे धर्मेंद्र यांनी  बागबान चित्रपट पाहण्यास नकार दिला होता. 

'बागबान' चित्रपटात सलमान खाननेही छोटी भुमिका केली होती. तो बिग बी आणि हेमा मालिनी यांच्या दत्तक मुलाच्या भूमिकेत दिसला होता. सलमानचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. पण त्याचे वडील सलीम खान यांच्या पसंतीस पडला नव्हता. तो चांगल्या माणसाची भूमिका नीट करू शकला नाही. सलमानचा अभिनय खोटा वाटला होता, असे सलीम खान यांचे म्हणणे होते. 

 

तर 'बागबान' चित्रपटातील 'मैं यहां तू वहां' हे  गाणे आजही लोकांना रडवते. या गाण्याचे बोल गीतकार समीर अंजान यांनी लिहिले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता की, गाण्यासंदर्भात मी बीआर चोप्रा यांची भेट घेतली आणि त्यांना गाण्याचे बोल ऐकवले.  गाण्याचे बोल ऐकताच बीआर चोप्रा यांना रडू कोसळले होते. आमची भेट होण्याच्या काही दिवसांपुर्वीच बीआर चोप्रा यांच्या पत्नीचे निधन झाले होते. गाण्यातले बोल हे बीआर चोप्राच्या त्यावेळच्या परिस्थितीला अगदी अनुकूल होते.

'बागबान' चित्रपटात एका कुटुंबाची कथा दाखवण्यात आली होती. चित्रपटात लहान मुले कशी मोठी होऊन नंतर आई-वडिलांना ओझे समजतात, हे दाखवले आहे. रवी चोप्रा दिग्दर्शित ‘बागबान’ या चित्रपटात सलमान खान, महिमा चौधरी, अमन वर्मा आणि समीर सोनी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.  'बागबान' चित्रपटानंतर हेमा मालिनी अमिताभ बच्चनसोबत 'वीर-जारा'मध्येही दिसल्या होत्या. हा चित्रपटही यशस्वी झाला होता.

टॅग्स :अमिताभ बच्चनहेमा मालिनीसलमान खान