प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रणौतवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची आज (१४ सप्टेंबर २०२१) न्यायालयात सुनावणी होती. मात्र, कंगना गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर, 'पुढच्या सुनावणीस कंगना परत गैरहजर राहिली तर तिच्याविरोधात अटक वॉरंट काढावं लागेल', असंदेखील न्यायलयाने स्पष्ट केलं आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर कंगनाने एका मुलाखतीत जावेद अख्तर यांच्यावर काही आरोप केले होते. या आरोपांमुळे आपली मानहानी झाल्याचं म्हणत जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. याच प्रकरणी आज सुनावणी करण्यात आली. यावेळी जावेद अख्तर व त्यांची पत्नी शबाना आझमी न्यायलयात उपस्थित होते. मात्र, कंगना ऐनवेळी गैरहजर राहिली. त्यामुळेच न्यायाधीशांनी तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.
आज सुनावणीच्या दरम्यान कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी न्यायालयात हजर होते.मात्र,कंगना गैरहजर असल्यामुळे या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानुसार, आता पुढील सुनावणी २० सप्टेंबर रोजी होईल.
'सगळे जण धर्म नष्ट करण्याच्या मार्गावर'; दहशतवादावर कोंकणा सेन व्यक्त
"या प्रकरणाची पुढील सुनावणी २० सप्टेंबर रोजी होईल. पण, जर त्यावेळीदेखील कंगना गैरहजर राहिली तर तिच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात येईल", अशा तीव्र शब्दात न्यायालयाने आदेश दिले आहेत. परंतु, यावेळी कंगनाच्या वकिलांनी तिचा मेडिकल सर्टिफिकेट देत तिची प्रकृती स्थिर नसल्याचं म्हटलं आहे. गेल्या १५ दिवसांपासून तिच्यात कोविडची लक्षण आहेत. त्यामुळे पुढील ७ दिवसांचा अवधी तिला मिळावा, अशी मागणी तिच्या वकिलांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने एका मुलाखतीत जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधाने केली होती. यावरुन गीतकार जावेद अख्तर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये कंगनाविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. "माझी विनाकारण मानहानी झाली असून प्रचंड मनस्ताप झाला आहे, असा आरोप करत कंगनावर फौजदारी खटला चालवावा", अशी मागणी जावेद अख्तर यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे केली होती.