दीड वर्ष झालं काम नाही... पैसा नाही...! कोरोनानं वाढवली अभिनेता अयुब खान यांची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 01:09 PM2021-04-20T13:09:29+5:302021-04-20T13:11:37+5:30
स्थिती आणखी बिघडली तर मला...; कोरोना महामारीमुळे अयुब खान आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.
गेल्या दीड वर्षापासून काम नाही. या दीड वर्षांत मी काहीही कमावले नाही. आता तर पै पैला मोताद झालोय. होते नव्हते तेवढे पैसेही संपत आहेत. स्थिती बदलली नाही तर उसनवारी करावी लागेल. लोकांना पैसे मागावे लागतील..., हे शब्द आहेत सिनेमा व टीव्ही अभिनेता अयुब खान (Ayub Khan) यांचे. कोरोना महामारीमुळे (Coronavirus Crisis) अयुब खान आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. (actor ayub khan is in financial crisis)
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पुन्हा एकदा शूटींग बंद झाले आहे. इंडस्ट्रीच्या भरवश्यावर पोट भरणा-या शेकडो मजूर, तंत्रज्ञांना काम बंद करून घरी बसण्याची पाळी आली आहे. अनेक कलाकारांचेही या महामारीने कंबरडे मोडले आहे. अयुब खान त्यापैकीच एक.
52 वर्षांच्या अयुब खान यांच्याकडे दीड वर्षांपासून काम नाही. एका ताज्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, कोरोनाने सर्वांचे आयुष्य प्रभावित केले आहे. प्रत्येकजण संघर्ष करतोय. दीड वर्षांपासून माझ्याकडे काम नाही. दीड वर्षांपासून मी पैसे कमावले नाहीत. बँक बॅलेन्स संपला आहे. पण मी काहीही करू शकत नाही. आता जे आहे, त्यातच दिवस काढावे लागतील. स्थिती आणखी बिघडली तर मला लोकांपुढे हात पसरावे लागतील. यापेक्षा दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक उरत नाही.
लॉकडाऊन केले नाही तर कोरोना वाढतो आणि लॉकडाऊन केले गरिबांचे हाल होतात. मी कोरोनामुळे माझ्या काही आप्तांना गमावले आहे. कोरोनाची भीषणताही मी समजू शकतो. आपल्या जवळच्या लोकांना गमावण्याचे दु:ख मी समजू शकतो. स्थिती भीषण आहे, असेही ते म्हणाले.
अयुब खान 1992 साली प्रदर्शित ‘माशूक’ सिनेमामुळे चर्चेत आले होते़ छोट्या पडद्यावर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी काम केले़ उतरन, शक्ती- अस्तित्व के एहसास की, रंजू की बेटियां या मालिकेत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या़