बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा बहुचर्चित चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा सिनेमा पहिल्याच दिवशी पन्नास कोटींचा बिझनेस करू शकेल असे व्यापार विश्लेषकांनी म्हटले होते. त्यांचा हा अंदाज खरा ठरला असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५२.२५ करोड रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने आजवरच्या सगळ्या चित्रपटांचा पहिल्या दिवसाच्या कमाईचा रेकॉर्ड मोडला आहे. पण दुसऱ्या दिवशी या चित्रपटाला केवळ २८ करोड रुपये कमावता आले आणि आता तर या चित्रपटाचे कलेक्शन दिवसेंदिवस कमी होत आहे.
ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाला समीक्षकांनी तर चांगलेच धारेवर धरले होते. तसेच सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची चांगलीच खिल्ली उडवली गेली होती. हा चित्रपट पाहिलेल्या अनेक लोकांनी तर त्यांचे पैसे वाया गेले असल्याची प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता हेच पैसे तुम्हाला वसूल करण्यासाठी एक भन्नाट कल्पना आम्ही देणार आहोत. ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांनंतर एका चप्पल विक्रेत्याला मार्केटिंगचा अनोखा फंडा सुचला आणि त्याने तो अंमलात देखील आणला आहे. वहाण या कोल्हापूरी चप्पल विक्रेत्याच्या फेसबुक पेजवर ठग्स ऑफ हिंदुस्तान संदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या लोकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ठग्स ऑफ हिंदुस्थान नामक आपत्तीत सापडलेल्या सर्वांबाबतीत वहाण सहानुभूती व्यक्त करत आहे, तरी तुमचं दुःख कमी करण्यास वहाण सदैव प्रयत्नशील राहिला आहे. आजही तुमचा तिकिटासोबतचा फोटो आम्हाला पाठवा आणि वहाण खरेदीत तिकिटाच्या रकमेची सूट मिळवा. तुम्ही आधीच खूप सहन केलंय निदान पैसे वाया जाण्यापासून तरी वहाण वाचवू शकतो.
फेसबुकवरील ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झालेली आहे.