Join us  

जर तुम्ही ‘क्रिश-४’ची प्रतीक्षा करत असाल, तर ही बातमी वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2017 4:36 PM

यावर्षाच्या सुरुवातीलाच रिलीज झालेल्या हृतिक रोशनच्या ‘काबिल’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिली होती. चित्रपटातील अभिनेत्री यामी गौतम ...

यावर्षाच्या सुरुवातीलाच रिलीज झालेल्या हृतिक रोशनच्या ‘काबिल’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिली होती. चित्रपटातील अभिनेत्री यामी गौतम आणि हृतिकची केमिस्ट्री प्रेक्षकांना एवढी भावली होती की, चित्रपटाने काही दिवसातच शंभर कोटीच्या क्लबमध्ये स्थान मिळविले. या चित्रपटानंतर असा अंदाज बांधला जात होता की, हीच जोडी ‘क्रिश-४’मध्ये बघावयास मिळेल; मात्र याविषयी अधिकृतरीत्या कुठलीही माहिती समोर आली नसल्याने, याविषयी केवळ तर्कवितर्क लावले जात होते; मात्र आता याबाबतची अधिकृत बातमी समोर आली असून, या जोडीबद्दल एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. हृतिकने त्याच्या या चित्रपटाविषयी डीएनएकडे मोठा खुलासा करताना म्हटले की, मी आता या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली आहे. हृतिकने दिलेल्या माहितीनुसार, ‘माझ्या वडिलांनी या चित्रपटाविषयी एक आयडिया सुचविली आहे. आता आम्हाला एकत्र बसून, या आयडियावर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून या आयडियाचे एका चांगल्या स्क्रिप्टमध्ये रूपांतर होऊ शकेल. यामध्ये थोडा वेळ लागेल.जेव्हा हृतिकला या चित्रपटातील अभिनेत्रीविषयी विचारण्यात आले तेव्हा त्याने स्मित हास्य देत उत्तर दिले. हृतिकने म्हटले की, ‘मी माझ्या वडिलांकडून केवळ या चित्रपटाविषयीची आयडिया ऐकली आहे, जी मला आवडली आहे. पुढे काय होईल ते तेव्हा बघितले जाईल.’ वास्तविक हृतिक ‘क्रिश-४’ अगोदर दिग्दर्शक विकास बहल यांच्या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. या चित्रपटाची कथा भारतीय गणितज्ञावर आधारित आहे. त्यामुळे हृतिक सुपरहिरोच्या अवताराअगोदर गणितज्ज्ञाच्या भूमिकेत बघावयास मिळेल. वास्तविक हृतिकचा विकास बहल यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय बुचकळ्यात पाडणारा आहे. कारण त्याने ‘क्रिश-४’साठी अनेक मोठ्या प्रोजेक्टला नकार दिला आहे. अशात त्याने विकास बहल यांनाच का होकार दिला याविषयी चर्चा रंगत आहे. दरम्यान हृतिकने नकार दिलेले सर्व प्रोजेक्ट हे मसाला चित्रपट असल्याची माहिती समजते.