‘कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं’ हे कोडं सोडवायचं असेल तर हे वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2017 12:52 PM
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण भारताला पडलेला यक्ष प्रश्न म्हणजे ‘कट्टपाने बाहुबलीला का मारलं’! आता या प्रश्नाचं उत्तर बाहुबलीचा दुसरा भाग ...
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण भारताला पडलेला यक्ष प्रश्न म्हणजे ‘कट्टपाने बाहुबलीला का मारलं’! आता या प्रश्नाचं उत्तर बाहुबलीचा दुसरा भाग म्हणजेच ‘बाहुबली : द कनक्ल्युजन्स’ रिलिज होण्याअगोदरच प्रेक्षकांना मिळणार आहे. कारण बाहुबलीचे निर्माता सिनेमाची ग्राफिक्स कादंबरी घेऊन येत असून, ‘बाहुबली : बॅटल आॅफ द बोल्ड’ असे त्याचे टायटल असणार आहे. यामधून प्रेक्षकांना ‘...अखेर कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं’ या गहन प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. गेल्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने सिनेमाचे मोशन पोस्टर रिलिज करण्यात आले होते. हे पोस्टर प्रेक्षकांना जबरदस्त भावल्यानेच निर्मात्यांनी ग्राफिक्स कादंबरी लिहिण्याचे ठरविले आहे. विशेष म्हणजे ही कादंबरी बाहुबलीचा पुढचा भाग रिलिज होण्याअगोदरच प्रकाशित केली जाणार असल्याने प्रेक्षकांना त्यांच्या बºयाचशा प्रश्नांची उत्तरे यातून मिळण्याची शक्यता आहे. ही कादंबरी प्रेक्षकांना त्यांच्या मोबाइलवर फ्री डाउनलोड करता येणार असल्याने प्रेक्षक याविषयी प्रचंड आतूर आहेत. कादंबरीत भल्लाव देव आणि बाहुबली यांच्यातील तुफान युद्धाची माहिती देण्यात येणार आहे. बाहुबलीचा दुसरा भाग येत्या २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांना सिनेमागृहात बघावयास मिळणार आहे; मात्र रिलिज अगोदरच या सिनेमाने आतापर्यंत पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. सॅटेलाइट राइट्सद्वारे ही कमाई केलेली असून, यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हा सिनेमा हिंदीसह चार भाषांमध्ये रिलिज केला जाईल. सिनेमाच्या पोस्टरविषयी बोलायचे झाल्यास आतापर्यंत तीन पोस्टर्स रिलिज केले गेले असून, ज्यामध्ये पहिले पोस्टर सिनेमाचा मुख्य अभिनेता प्रभास याचे आहे. तर दुसरे राणा डग्गुबाती याचे असून, तिसºया पोस्टरमध्ये प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी बघावयास मिळत आहेत. बाहुबलीचा पहिला भाग प्रचंड पसंत केला गेला. भारतीय सिनेमामधील आतापर्यंतचा सर्वाधिक हिट सिनेमा म्हणून बाहुबलीने रेकॉर्ड केला. आता असाच काहीसा रेकॉर्ड करण्यास बाहुबलीचा दुसरा भाग सज्ज आहे.