अज्ञात माणसाने कारण नसताना आपला पाठलाग करण्याचा अनुभव प्रत्येक महिलेला जीवनात एकदा तरी येतच असतो. आपल्या मागावर सतत कोणीतरी आहे, ही भावनाच मनाचा थरकाप उडविणारी असते. त्या भीतीचे ओरखडे अनेक वर्षे मनावरून पुसले जात नाहीत. स्टार भारतवरील एका आगामी मालिकेचे शीर्षकगीतध्वनिमुद्रित केलेल्या नामवंत पार्श्वगायिका इला अरुणनेही आपल्याला आलेला असा एक अनुभव अलीकडेच उघड केला.
स्टार भारतवरील या आगामी मालिकेची कथा मुलीचा पाठलाग करणा-या मुलीच्या अनुभवावरच आधारित आहे. या मालिकेचे शीर्षकगीत ध्वनिमुद्रित करीत असताना त्याच्या शब्दांनी इला अरूण भारावून गेली आणि तिने यासंदर्भात आपल्याला आलेला अनुभव विशद केला. तिच्या एका पुरुष चाहत्याने तिला एक पुस्तक भेट पाठविले. त्या पुस्तकात त्याने त्याला इला अरूणबरोबर काय काय करायला आवडेल, याची माहिती दिली होती. हे पुस्तक पाहून इलाच्या मनात जशी घृणा उत्पन्न झाली, तशीच एक भीतीही निर्माण झाली. जेव्हा केव्हा तिच्या नावाने एखादे पार्सल येत असे, तेव्हा तेव्हा तिचा जीव भीतीने अर्धमेला होत असे.
हा भीतीदायक अनुभव कथन करताना इला म्हणाली, “जेव्हा या माणसाने माझा पाठलाग केला होता, तेव्हा त्या घटनेचा भीतीचा पगडा दीर्घ काळ माझ्या मनावर पडला होता. माझ्याबरोबरच्या माणसांना मी माझ्या नावाने आलेलं पार्सल उघडायला सांगत असे. एखाद्यावरील प्रेम व्यक्त करणं ही एक गोष्ट झाली, पण तिच्याबद्दल अश्लील लिहिणं हा घृणास्पद आणि निंदनीय अपराध आहे. ती घटना कालच घडली असावी, इतकी माझी त्या प्रसंगाबद्दलची आठवण ताजी आहे.”