बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज इंटरनेटवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. इलियानाच्या चित्रपटाचीच नाही तर तिच्या पर्सनल लाईफच्या फोटोंची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करतात. पण फोटोंमध्ये छेडछाड करून आपल्या विकृत मानसिकतेचा परिचय देणारेही अनेक आहेत. हे लोक इलियानाचे फोटो एडिट करून तिच्या शरीराच्या विशिष्ट अंगावर फोकस करतात. हे असले एडिट झालेले फोटो पाहिले की, इलियाचा संताप अनावर होतो.
ताज्या मुलाखतीत इलियाना यावर बोलली. ती म्हणाली की, अनेकदा माझे एडिट केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. शरीराच्या विशिष्ट अंगांवर फोकस करणारे हे फोटो पाहिले की, माझा पारा चढतो. वयाच्या 13-14 व्या वर्षांपासून मी बॉडी शेमिंगचा सामना करतेय. माझ्या शरीरावरून मला इतके ऐकवले गेले की, आता मला काहीच वाटत नाही. त्या क्षणापुरता राग येतो. पण नंतर मी त्याकडे दुर्लक्ष करते. कदाचित दुर्लक्ष करणे मी शिकले आहे. आपण सगळे मनुष्यप्राणी आहोत आणि परिपूर्ण नसणे, हा कुठला आजार नाही. तुमच्यातील कमतरता, तुमच्यातील त्रुटी यातही सौंदर्य असते. फक्त त्याकडे बघण्याची दृष्टी हवी, असेही इलियाना म्हणाली.
इलियाना गेल्या अनेक वर्षांपासून बॉडी डिस्मॉर्फिया नावाच्या आजाराने पीडित होती. या आजारात शरीराचा शेप बिघडतो. ज्यामुळे शरीराचा आकार वेगळा दिसायला लागतो. याकाळात इलियाना डिप्रेशनमध्ये गेली होती. केवळ इतकेच नाही तर तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. पण योग्य उपचारांच्या मदतीने इलियाना या आजारातून बाहेर पडली.