'लैला मजनू', 'हायवे', 'जब वी मेट' यांसारखे एकापेक्षा एक सिनेमे देणारे दिग्दर्शक इम्तियाज अली (Imtiaz Ali) सर्वांचे आवडते आहेत. त्यांच्या सिनेमांमध्ये नेहमी प्रवास दाखवण्यात येतो. त्यामुळे शूटिंगची ठिकाणंही वेगवेगळी आणि सुंदर असतात. नुकतंच इम्तियाज अली सिनेमाच्या सेटवर महिलांची कशी सुरक्षा असते यावर बोलले. तसंच परिस्थिती कशी बदलत आहे यावरही त्यांनी संवाद साधला.
गोवा येथे आयोजित 'आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव'(IFFI) मध्ये इम्तियाज अली, भूमी पेडणेकर आणि वाणी त्रिपाठी पॅनल चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी इम्तियाज अली अभिनेत्रींसाठी बदलत्या परिस्थितीवर भाष्य केले. आपल्या दोन दशकांच्या करिअरमध्ये तीन वेळा त्यांना सेटवर चुकीच्या व्यवहारप्रकरणी क्रू मेंबरला काढावे लागल्याचा खुलासा केला.
ते म्हणाले, "रणदीप हुड्डा आणि आलिया भटच्या हायवे सिनेमाचं शूट आम्ही दूर डोंगराळ भागात करत होतो. तिथे व्हॅनिटी व्हॅनची सुविधा नव्हती. आलियाला कपडे बदलण्यासाठी आणि वॉशरुमसाठी इकडे तिकडे जावं लागायचं. यावेळी मी पाहिलं की एक क्रू मेंबर जाणूनबुजून सतत तिच्या आजूबाजूला राहायचा प्रयत्न करत होता. मी त्याला लगेच काढलं. अशा घटना तीन वेळा झाल्या आहेत. पण आता परिस्थिती बदलत आहे आता अभिनेत्रींसाठी सेट सुरक्षित आहेत."
कास्टिंग काऊचच्या घटनांवर इम्तियाज अली म्हणाले, "मी या इंडस्ट्रीत १५ ते २० वर्षांपासून आहे. मी कास्टिंग काऊचबद्दल बरंच ऐकलं आहे. एक मुलगी येते, ती घाबरलेली असते आणि तिला तडजोड करण्याची गरज वाटते. मला एकच सांगायचंय की जर कोणी महिला किंवा मुलगी 'नाही' म्हणू शकत नाही, तर तिला यश मिळण्याच्या शक्यता वाढतील हे आवश्यक नाही."