बॉलिवूडचा सीरियल किसर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मी अजय देवगणसोबत 'बादशाहो' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. आता इमरान आगामी चित्रपट 'चिट इंडिया'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लखनऊमध्ये सुरूवात केली आहे. या सिनेमाच्या सेटवरील मुहूर्ताचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहेत. दिग्दर्शक व फोटोग्राफर अतुल कासबेकर यांनी टीमसोबत चित्रपटाच्या पहिल्या शूटिंग शेड्युलला सुरूवात केली आहे.
'चिट इंडिया' चित्रपटाची कथा शिक्षणावर आधारीत असून देशातील शिक्षणाचा बाजार व भ्रष्टाचारावर भाष्य करतो. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारीत आहे. या चित्रपटाची निर्मिती इमरान हाश्मी करतो आहे. 'चिट इंडिया' चित्रपट पुढील वर्षी 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात सत्तर कलाकार काम करताना दिसणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण पस्तीस दिवस चालणार असून उत्तर भारतात या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाणार आहे.
एका मुलाखतीत इमरानने सांगितले होते की, 'माझ्या बॉलिवूडमधील कारकीर्दीतील सर्वात अविस्मरणीय अशी ही भूमिका असणार आहे. चिट इंडियाची पटकथा व शीर्षक खूप चांगली आहे. जेव्हा चित्रपटाची कथा वाचल्यानंतर भूमिका करण्यासाठी मी खूप उत्सुक झालो. तसेच मी या चित्रपटातील टीम व दिग्दर्शक सौमिक सेनसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. 'सौमिक सेन म्हणाले की, 'या चित्रपटाची कथा भारतात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची कथा आहे जो शिक्षणाच्या दबावाखाली वावरतो आहे. या चित्रपटाचा विषय तरूणाईला जवळचा वाटेल. ' इमरान हाश्मी चिट इंडियामध्ये कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप समजलेले नाही. त्यामुळे त्याचे चाहते या सिनेमाबद्दल आणखीन गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.