मल्याळम, तमिळ सिनेमांमध्ये दिसलेला अभिनेता फहाद फासिलने (Fahadh Faasil) प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. 'आवेशम', 'पुष्पा' या सिनेमांमुळे तो जगभराच प्रसिद्ध झाला आहे. फहाद नुकताच 'पुष्पा २' मध्येही दिसला. यामध्ये तो व्हिलनच्या भूमिकेत होता. आता त्याच्या बॉलिवूड पदार्पणाविषयीही माहिती समोर आली आहे. दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या (Imtiaz Ali) सिनेमातून फहाद फासिल हिंदीमध्ये डेब्यू करणार आहे.
हॉलिवूड रिपोर्टर ऑफ इंडियाच्या राऊंडटेबल मुलाखतीत इम्तियाज अलीने स्वत:च ही माहिती दिली. ते म्हणाले, "ही घोषणा खूपच आधी झाली. म्हणजे सिनेमा करणारच आहे पण कदाचित लगेच पुढचा सिनेमा तोच नसेल. पण हो मला बऱ्याच काळापासून हा सिनेमा बनवायचा आहे. याचं नाव 'द इडियट ऑफ इस्तांबुल' असं असणार आहे."
या सिनेमात फहाद लीड रोलमध्ये दिसणार का? असं विचारलं असता ते म्हणाले, "मला नक्कीच आवडेल...हो. आता तुम्ही हे विचारलंच आहे तर मला माहित नाही मी हे रिव्हील करु शकतो की नाही. पण हो फहादसोबत सिनेमा बनवण्याचा माझा प्लॅन आहे. जर प्लॅनिंगनुसार सगळं झालं तर फहादचं हे हिंदीतील पदार्पण असेल. "
फहाद मल्याळम सिनेमालाच जास्त प्राधान्य देणारा आहे. पण तो आता तमिळ, तेलुगुमध्येही दिसत आहे. त्यामुळे आता लवकरच तो हिंदीतही दिसेल अशी आशा आहे.