'अॅनिमल' सिनेमा २०२३ च्या डिसेंबरमध्ये प्रचंड गाजलेला. हा सिनेमा आजही चर्चेचा विषय ठरतो. 'अॅनिमल'मधील काही प्रसंगावर आक्षेप घेण्यात आला. काही प्रसंग वादग्रस्त ठरले. 'अॅनिमल' सिनेमावर जो आरोप झाला त्यावर संदीप रेड्डी वांगा यांनी वेळोवेळी उत्तर दिलं. कबीर सिंग आणि 'अॅनिमल' सिनेमांचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा नुकतेच इंडियन आयडॉलमध्ये सहभागी झालेले. तेव्हा इंडियन आयडॉलमधील एका स्पर्धकाने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत आहे.
इंडियन आयडॉलच्या स्पर्धकाची दिग्दर्शकासमोरच रोखठोक प्रतिक्रिया
इंडियन आयडॉलमधील स्पर्धक मानसी ही मंचावर येते. तेव्हा ती 'अॅनिमल'चे दिग्दर्शक अर्थात संदीप रेड्डी वांगा यांना सांगते की, "अॅनिमल'मधील काही सीन मला आवडले नाहीत. एक सीन असा आहे की जेव्हा नायक नायिकेला त्याचे शूज चाटायला लावतो. या सीनबद्दल मला वैयक्तिकरित्या खूप अडचण आहे." हे ऐकताच संदीप म्हणाले की, "पण असं झालं नाही ना. तुम्हाला शूट चाटायच्या सीनबद्दल प्रॉब्लेम आहे पण हिरो ३०० लोकांना मारतो त्या सीनबद्दल तुम्हाला काही वाटत नाही?"
पुढे मानसीने जावेद अख्तर यांचं उदाहरण देऊन सांगितलं की, "जावेद यांनी असे सिनेमे समाजासाठी घातक असतात, असं ते म्हणाले होते." यावर संदीप म्हणाले की, "जर जावेद सर गीतकार किंवा पटकथालेखक नसते तर मी त्यांचं म्हणणं गांभीर्याने घेतलं असतं." पुढे कबीर सिंग सिनेमातील टॉक्सिक रिलेशनशीपबद्दलही मानसीने आक्षेप घेतला. तेव्हा शेवटी संदीप वांगा म्हणाले की, "ते त्यांचं प्रेम होतं. काहीतरी शिकायला मिळेल त्यासाठी सिनेमे पाहू नका. सिनेमा फक्त मनोरंजनासाठी बघा. त्यासाठी तुमचा विशिष्ट दृष्टीकोन बाजूला ठेवा. कायम अशी माणसं असतात जे फक्त प्रॉब्लेम बघतात. त्यामुळे सिनेमाला नॉर्मली बघा."