विधु विनोद चोप्रा यांच्या 12th Fail या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. या सगळ्यात सर्वाधिक कौतुक झालं ते आयपीएस मनोज कुमार शर्मा यांची भूमिका साकारणाऱ्या विक्रांत मेस्सीचं. विक्रांतनं जीव ओतून साकारलेलं ते पात्र चाहत्यांच्या मनात घर करुन गेलं. आयपीएस मनोज कुमार शर्मा यांनी बारावी नापास झालो म्हणून हार न मानता आयपीएस पदाला गवसणी घातली. या अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या विक्रांत मेस्सीचं शिक्षण किती झालंय हे तुम्हाला माहितेय का? ते आपण जाणून घेऊया.
विक्रांतचा 3 एप्रिल 1987 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय ख्रिश्चन कुटुंबात जन्म झाला. विक्रांतनं मुंबईच्या सेंट अँथनी स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या आरडी नॅशनल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये प्रवेश घेतला आणि संपूर्ण ग्रॅज्युएशन तिथेच पूर्ण केले. विक्रांतला लहानपणापासूनच डान्सची आवड होती. २००७ मध्ये त्याने एका रियालिटी शोमध्ये सुद्धा भाग घेतला होता.
विक्रांत हा प्रशिक्षित ट्रेंड जॅझ डान्सर आहे. डान्ससोबतच तो शाळेत नाटकांमध्ये अभिनय करायचा. त्याची प्रतिभा ओळखून शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी देखील सहकार्य केलं. त्यानं आपल्या कारकिर्दीची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली आहे. विक्रांतनं 'कहां हूँ मैं', 'धरमवीर', 'बालिका वधू', 'कुबूल है' सारख्या मालिकांमध्ये काम केले.
टेलिव्हिजननंतर विक्रांतनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्याचा पहिला चित्रपट 'लुटेरा' 2013 साली प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये त्याने देवदास मुखर्जीची भूमिका केली होती. यानंतर, 'दिल धडकने दो', 'अ डेथ इन द गुंज' आणि 'छपाक' सारख्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. सिनेमा नाही तर विक्रांतनं वेबसीरिजमध्ये दमदार कामगिरी केली. 'मिर्झापूर' आणि 'क्रिमिनल जस्टिस' सारख्या वेबसीरिजमधून त्याची लोकप्रियता आणखी वाढली.