आशिया चषक स्पर्धेत ( Asia Cup 2022) भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर रोमहर्षक विजयाची नोंद केली. हार्दिक पांड्या, विराट कोहली, रवींद्रर् जडेजा, भुवनेश्वर कुमार अगदी नव्याने दाखल झालेल्या अर्षदीप सिंग यानेही उल्लेखनीय कामगिरी करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. पण, भारतीय संघाचा भावी कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातेय तो लोकेश राहुल ( KL Rahul) मात्र शून्यावर बाद झाला. १९ वर्षीय गोलंदाज नसीम शाह याच्या चेंडूवर लोकेश 'Golden Duck'वर माघारी परतला. यावरून त्याच्यावर टीका होणे स्वाभाविक आहे, परंतु तूर्तास केएलमुळे बॉलिवूड अभिनेत्रीला ट्रोलर्सचा सामना करावा लागतोय...
होय, सुनील शेट्टीची लाडकी लेक व अभिनेत्री अथिया शेट्टी ( Athiya Shetty) हिला ट्रोल केलं जात आहे. आता या मागचं कारण काय, याचा अंदाज तुम्ही बांधू शकताच.
सलामीला आलेला लोकेश राहुल पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाल्यामुळे संघावर दबाव वाढला. याच कारणामुळे अथिया शेट्टी ट्रोल होतेय. केएल राहुलच्या खराब खेळीसाठी त्याची गर्लफ्रेन्ड अथिया शेट्टीला जबाबदार ठरवत, अनेकजण सोशल मीडियावर अथियाला ट्रोल करत आहेत. अथियावरचे मीम्सही व्हायरल होत आहेत.
अण्णांची लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के. एल. राहुल दोघंही प्रेमात आहेत. दोघंही लवकरच लग्न करणार असल्याचं कळतंय. पण कालच्या मॅचमध्ये के. एल. राहुल शून्यावर बाद झालेला पाहून नेटकऱ्यांनी अथियावर राग काढला आहे. अगदी ‘लग्न कॅन्सल’ म्हणत, अनेकांनी अथियाला ट्रोल केलं आहे.
अथिया आणि राहुल गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सुरूवातीला अथिया व केएल यांच्यापैकी कुणीही अधिकृतपणे या नात्याची कबुली दिली नव्हती. पण डेटींगच्या चर्चेला हवा देण्याचं काम मात्र त्यांनी न चुकता केलं होतं. दोघांचे एकत्र फोटो शेअर करणं, एकत्र बाहेर फिरणं, एक दुस-यांचे फोटो शेअर करत त्यावर क्यूट कमेंट करणं यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
अथिया शेट्टी हिने ‘हिरो’या चित्रपटातून डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. अनीस अज्मीच्या ‘मुबारकां’मध्ये अथियाला दुसरी संधी मिळाली. पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला. ‘मोतीचूर चकनाचूर’ हा तिचा तिसरा सिनेमाही सुपरडुपर फ्लॉप झाला. तिसरा चित्रपटही फ्लॉप ठरल्यानंतर अथियाच्या करिअरची नौका बुडताना दिसतेय. पण दुसरीकडे अथियाच्या लव्ह लाईफची चर्चा जोरात आहे.