स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशभक्तीने ओतप्रोत भरलेले सिनेमे पाहताना ऊर अभिमानाने भरून येतो. ‘बॉर्डर’ (Border) हा असाच एक सिनेमा. जेपी दत्ता ( JP Dutta) यांना बॉर्डर, एलओसी कारगिल सारख्या देशभक्तीपर सिनेमांसाठी ओळखले जाते. ‘बॉर्डर’ त्यांचा गाजलेला सिनेमा. पण हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर जेपी दत्ता यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या, हे तुम्हाला ठाऊक आहे का? या धमक्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. ‘बॉर्डर’नंतर जेपींना ‘एलओसी कारगिल’ हा सिनेमा बनवायचा होता. हा सिनेमा बनवतानाही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
फोर्ब्ससाठी लिहिलेल्या उका कॉलममध्ये जेपींनी खुद्द या धमक्यांचा उल्लेख केला आहे. ‘बॉर्डर’ सिनेमा रिलीज होताच दोन बॉडीगार्ड अगदी सावलीसारखे माझ्यामागे असत. चार महिन्यांपर्यंत मला एकट्याने घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. मला सतत धमक्या मिळत होत्या. माझ्या जीवाला धोका होता, असे त्यांनी यात म्हटले आहे.
युद्धावर चित्रपट बनवणा-या जेपींना कथितरित्या पाकिस्तानातून धमक्या मिळाल्या होत्या. अर्थात या धमक्यांना घाबरणा-यांपैकी जेपी नव्हते. उलट ‘बॉर्डर’नंतर जेपींनी कारगिल युद्धावर सिनेमा बनवायला घेतला होता. सतत धमक्या मिळत असल्याने जेपींनी हा सिनेमा बनवू नये, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे होते. पण जेपी ठाम होते. सर्वांना एक ना एक दिवस मरायचे आहे. सैनिक माझ्यासाठी शहीद होतो तर मी त्यांच्यासाठी का मरू नये? मी अशा धमक्यांना घाबरणारा नाही, असे त्यांनी कुटुंबीयांना समजावले होते.‘एलओसी कारगिल’नंतर धमक्यांचे सत्र थांबले. 1999 च्या कारगिल युद्धावर आधारित या चित्रपटात अजय देवगण, संजय दत्त, अभिषेक, सुनील शेट्टी, सैफ अली खान, मनोज वाजपेयी, अक्षय खन्ना, करिना कपूर, राणी मुखर्जी, रवीना टंडन व इशा देओल असे सगळे स्टार्स होते. ‘बॉर्डर’ एवढाच जेपींचा हा सिनेमाही गाजला होता.