बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे जगभर चाहते आहेत. यांचे लाखो-करोडो चाहते फक्त त्यांची एक झलक पहायला जवळ-पास रोजच त्यांच्या ‘जलसा’ या बंगल्याबाहेर उभे राहतात. बिग बी देखील आपल्या चाहत्यांचं मन कधी तोडत नाहीत. ते आपल्या चाहत्यांना एक झलक नक्कीच देतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासन् तास प्रतीक्षा करतात. पण अमिताभ यांचा एक जबरा चाहता सगळ्यांपेक्षा वेगळा ठरला. या चाहत्याने काय करावं तर त्याने चक्क आपल्या घराबाहेर बिग बींचा मोठा पुतळा उभारला.
होय, विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. न्यू जर्सीमधल्या एका भारतीय वंशाच्या अमेरिकन कुटुंबाने त्यांच्या घराबाहेर बिग बींचा मोठा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. गोपी शेठ असं या चाहत्याचं नाव आहे.
बिग बींच्या घरासमोर उभारलेल्या पुतळ्याचे काही फोटो गोपी शेठ यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘शनिवारी, 27 आॅगस्ट रोजी अमिताभ बच्चन यांचा पुतळा आम्ही आमच्या एडिसन इथल्या नव्या घराबाहेर उभारला आहे. या पुतळ्याच्या उद्घाटनप्रसंगी बिग बींचे अनेक चाहते उपस्थित होते,’ अशी पोस्ट गोपी शेठ यांनी लिहिली आहे.
इतका आला खर्च‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये बिग बी ज्या पोझमध्ये बसतात, त्याच पोझमध्ये अमिताभ यांचा हा पुतळा बनवण्यात आला आहे. विशेष म्हणजे राजस्थानमध्ये हा पुतळा बनवून अमेरिकेत पाठवला गेला. यासाठी गोपी यांना जवळपास 75 हजार डॉलर्स म्हणजेच 60 लाख रुपयांचा खर्च आला.
बिग बी आमच्यासाठी देवासारखे... बिग बी आमच्यासाठी देवासारखे आहेत, असं गोपी शेठ म्हणतात. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, मी आणि माझ्या पत्नीसाठी अमिताभ बच्चन देवासमान आहेत. त्यांचं रिल लाईफच नाही तर त्यांच्या रिअल लाईफमधूनही मला प्रेरणा मिळते. अमिताभ कमालीचे विनम्र आहेत. ते अन्य स्टार्ससारखे नाहीत. ते आपल्या चाहत्यांची अतोनात काळजी घेतात, त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात. म्हणूनच मला माझ्या घराबाहेर त्यांचा पुतळा उभारण्याची कल्पना सुचली. गोपी हे गुजरामधून 1990 मध्ये अमेरिकेला वास्तव्यास गेले. गेल्या तीन वर्षांपासून ते बिग बींसाठी एक वेबसाइट चालवत आहेत.