Join us

देश तुझ्या एकटीचा नाही... कि हो गया तैनू? कंगनावर पुन्हा भडकला दिलजीत दोसांज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 3:39 PM

कंगना-दिलजीत आमने-सामने, पुन्हा सुरु झाले ‘ट्वीटर वॉर’

ठळक मुद्दे याआधीही कंगना व दिलजीत यांच्यात सोशल मीडियावर चांगलेच ट्वीटर वॉर रंगले होते.

हॉलिवूड सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ट्वीट केले आणि सोशल मीडियावरचे वातावरण पुन्हा तापले.  कंगना राणौतच्या हाती तर आयते कोलीत मिळाले. रिहानाचे ट्वीट पडताच, कंगना कडाडली. एक लांबलचक पोस्ट लिहित तिने रिहानाला उत्तर दिले. मग कंगनालाही कोणीतरी उत्तर द्यायला हवे ना? यानंतर पंजाबी गायक व अभिनेता दिलजीत दोसांज मैदानात उतरला.

शेतकरी आंदोलासंदर्भात आपण चर्चा का करत नाही आहोत?  असा रियानाने तिच्या ट्वीटमधून सवाल तिने केला. तिचे हे ट्वीट पाहून कंगना लगेच अ‍ॅक्टिव्ह झाली. रिहानाच्या ट्विटला तिने लगेच उत्तर दिले. ‘यासंदर्भात यामुळे चर्चा होत नाहीय, कारण हे शेतकरी नाही, तर दहशतवादी आहेत. ज्यांची भारत तोडण्याची इच्छा आहे. म्हणजे चीन सारखे देश आपल्या राष्ट्रावर कब्जा करतील आणि यूएसए सारखी चायनीज कॉलनी तयार करतील. तू शांत रहा मूर्ख. आम्ही तुझ्या सारखे मूर्ख नाही, की आपल्या देशाला विकू,’ अशा शब्दांत कंगनाने रिहानाला फटकारले. कंगनाच्या या ट्वीटला दिलजीतने नेहमीप्रमाणे पंजाबीत उत्तर दिले.‘ओ तेरे खाली दा नि हैगा देश... कि हो गया तैनू? किसने बुलेखा पा ता तैनू? देश सारे दा भाई... होश कर होश... इंडिया साडा वी है भाई... तू जा यार बोर ना कर...,’ अशा शब्दांत त्याने कंगनाला सुनावले.

कंगनाने दिले उत्तर

दिलजीतच्या या ट्वीटने कंगना लालबुंद झाली. तिने लगेच पलटवार केला. देश फक्त भारतीयांचा आहे. खलिस्तान्यांचा नाही. तू खलिस्तानी नाहीस, असे म्हण. तू हे मान्य केले तर मी माफी मागेल. तू खरा देशभक्त आहेस, हे मान्य करेन. पण मला माहित आहे,  खलिस्तानी नाहीस, असे तू कधीही म्हणणार नाहीस. भेड की खाल में भेडिया, असे तिने लिहिले. हे ट्वीटर वॉर इथेच संपले नाही. यानंतरही कंगना व दिलजीतने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केलेत.

याआधीही कंगना व दिलजीत यांच्यात सोशल मीडियावर चांगलेच ट्वीटर वॉर रंगले होते. शेतकरी आंदोलनावरूनच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. हा वाद ब-याच दिवस चालला. या दोघांच्या वादानंतर लोकांनी अनेक भन्नाट मीम्स सोशल मीडियावर शेअर केले होते. 

टॅग्स :कंगना राणौतदिलजीत दोसांझ