पूर्वी इंग्रजांनी आक्रमण करत भारतावर राज्य केले होते, पण आज इंग्रजी चित्रपटांचे आक्रमण सुरू असून, ते भारतीय मनोरंजन विश्वावर हुकूमत गाजवू पाहात आहेत. याचा परिणाम भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर होत आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये २३ इंग्रजी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यावर जवळपास २५०० मिलियन डॅालर्सहून अधिक खर्च करण्यात आला असून, हे चित्रपट भारतात हजारो कोटी रुपयांची उलाढाल करतील असा चित्रपट व्यवसायतज्ज्ञांचा अंदाज आहे.
हॅालिवूडपटांसाठी भारत ही उत्तम बाजारपेठ असल्याचे ओळखून कोरोनापूर्व काळात बऱ्याच हॅालिवूडपटांनी आपल्याकडे तगडा व्यवसाय केला आहे. हॅालिवूडपटांचा खूप मोठा चाहता वर्ग भारतात आहे. त्यांची भव्य-दिव्यता आणि कल्पनाविस्तार करण्याची अफाट क्षमता पाहता दिवसागणिक हॅलिवूडपटांच्या चाहत्यांमध्ये भर पडत आहे. कोरोनानंतर भारतात रिलीज झालेल्या हॅालिवूडपटांची संख्या कमी झाली होती, पण यंदा पुढील सहा महिन्यांमध्ये २३ हॅालिवूडपट धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारतीयांची हॅालिवूडपटांप्रती असलेली आवड पाहता वितरकांपासून सिनेमागृहांपर्यंत सर्वच जण त्यांच्यासाठी पायघड्या घालण्यासाठी तयार असतात. महागडी तिकिटे आणि प्रेक्षकांच्या उत्साहामुळे सिनेमागृहांचा धंदाही तेजीत असतो. अशा वेळी इतर चित्रपटांना सिनेमागृहे मिळणे मुश्कील होते. हॅालिवूडपट रिलीज होण्यापूर्वी त्याचा इतका गाजावाजा होतो की हिंदीसोबतच मराठी चित्रपटही अगोदरच नांगी टाकतात. त्यामुळे हॅालिवूडपटाचा मार्ग मोकळा होतो.
याच महिन्यात 'स्पायडरमॅन', 'ट्रान्सफॅार्मर्स' आणि 'द फ्लॅश' या इंग्रजी चित्रपटांमागोमाग या शुक्रवारी 'इंडियाना जोन्स'ही रिलीज झाला आहे. जुलैमध्ये 'इन्सिडीयस', 'मिशन इम्पॅासिबल', 'ओपनहायमर', 'बार्बी' हे चित्रपट रिलीज होणार आहेत. त्यानंतर 'द मेग २', 'ब्लू बेटल', 'व्हाईट बर्ड', 'द इक्विलायझर ३', 'कार्व्हेन द हंटर', 'ड्यून २', 'कॅप्टन मार्व्हल २', 'अॅक्वामॅन अँड लॅास्ट किंगडम', 'स्नेक केव्ह', 'हॅान्टेड मॅन्शन', 'ग्रॅन टुरिस्मो', 'द लास्ट व्होएज आॅफ द सेमेटर', 'एक्सपेंडेबल्स ४', 'द क्रिएटर', 'निमोना', 'ब्लेड', 'नेक्स्ट गोल', 'लिगली ब्लॅान्ड ३' 'वोंका' हे इंग्रजी चित्रपट रिलीज होणार आहेत.
वेबसिरीजही दिमतीला...
'द विचर', 'एफ९ द फास्ट सागा', 'फेटल सिडक्शन', 'द फॉरएव्हर पर्ज', 'बॅास बेबी', 'अननोन : द लॅास्ट पिरॅमिड', 'द डिपेस्ट ब्रिथ', 'टायटन्स', 'रिटन इन द स्टार्स', 'जेन व्ही', 'टॉम क्लेन्सीज जॅक रायन', 'द हॅारर ऑफ डोलरिस रोच', 'द डमर आय', 'गुड ओमेन्स', 'द लॅास्ट फ्लॅावर्स ऑफ अॅलिस हार्ट', शेल्टर, 'द व्हील ऑफ टाईम', 'हुश हुश' आदी इंग्रजी वेब सिरीजही भारतीयांना खुणावणार आहेत.
हॅालिवूडपटांचे तिकीट दर...
कमीत कमी २५०-३०० रुपयेजास्तीत जास्त १०००-१२०० रुपये
मराठीतही घुसखोरी...
याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'स्पायडरमॅन' मराठीतही डब करण्यात आला होता. सचिन सुरेश या तरुणानेच मराठी डबिंग केले होते. हे पाहता भविष्यात भारतातील प्रादेषिक भाषांसमोरही आव्हान उभे करण्याच्या दृष्टीने हॅालिवूडपटांची वाटचाल सुरू केली आहे.
- कोमल नाहटा (फिल्म ट्रेड अॅनालिस्ट)
आज भारतीय सिनेमांसमोर हॅालिवूडचे चित्रपटांचे तगडे आव्हान आहे. इंग्रजी फ्रेंचाईज चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पाहून हिंदी चित्रपटांना आपल्या प्रदर्शनाची योजना आखावी लागत आहे. कारण आज हॅालिवूडपट भारतीय चित्रपटांसमोर खूप मोठे अपोझिशन बनले आहे. हॅालिवूड चित्रपट हिंदीसोबत इंग्रजीतही चांगला व्यवसाय करत असल्याने स्पर्धा खूप मोठी आहे. प्रेक्षकांनाही हॅालिवूडपट आवडत असल्याने असून, ते आता आपल्या मनोरंजनाचा एक भाग बनल्याने त्यांच्यासोबतच जगावे लागणार आहे.