अर्जुन कपूर स्टारर ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’ उद्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. या चित्रपटात अर्जुन एका हटके अवतारात दिसणार आहेत. साहजिकच अर्जुनचे चाहते त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण दुबईतील अर्जुनच्या चाहत्यांना मात्र या चित्रपटाला मुकावे लागणार आहे आणि यासाठी कारणीभूत ठरलाय तो चित्रपटाचा एक संवाद.होय, ताज्या बातमीनुसार, युएई सेन्सॉर बोर्डाने ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’च्या प्रदर्शनाला परवानगी नाकारली आहे. यात एक आक्षेपार्ह संवाद असल्याचे युएई सेन्सॉर बोर्डाने म्हटले आहे. ‘दुबई दहशतवाद्यांचा गड आहे,’ या आशयाचा संवाद युएई सेन्सॉर बोर्डाला खटकला आहे.
एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, ‘सबसे ज्यादा टेररिस्ट पाकिस्तान में या फिर दुबई में मौजूद है,’ असा एक डायलॉग चित्रपटात आहे. या डायलॉगवर युएई सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला. शिवाय हा डायलॉग गाळल्यास आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी देऊ, अशी भूमिका घेतली. पण ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’च्या मेकर्सनी डायलॉग गाळण्यात कुठलाही रस दाखवला नाही. मेकर्सच्या मते, चित्रपटातील एक डायलॉग संशोधन व तथ्यांवर आधारित आहे. आम्ही तो चित्रपटातून गाळणार नाही. मग भलेही आमचा चित्रपट तिथे रिलीज न होवो, असे मेकर्सनी म्हटले.‘रेड’ आणि ‘नो वन जेसिका किल्ड’ फेम दिग्दर्शक राज कुमार गुप्ता दिग्दर्शित हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित असल्याचे सांगण्यात येतेय. फॉक्स स्टार स्टूडिओ, राजकुमार गुप्ता, मायरा करणची निर्मिती असलेल्या या सिनेमात अर्जुनशिवाय अमृता पुरी आणि राजेश शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.