Join us

बप्पी लहरींच्या तब्येतीबद्दल मुलगा बप्पाने दिली माहिती, म्हणाला- ते आयसीयूत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 19:55 IST

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण झाली आहे

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती त्यांच्या प्रवक्त्याने स्टेटमेंटमध्ये सांगितली आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान आता त्यांचा मुलगा बप्पा लहरीने वडिलांच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे.

बप्पा लहरी सध्या लॉस अँजेलिसमध्ये म्युझिकचे शिक्षण घेत आहे. मात्र वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे तो मुंबईत आला. वडिलांच्या तब्येतीबद्दल माहिती देताना बप्पा लहरीने सांगितले की, त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्याने ही माहिती इंग्रेजी वेबसाइट स्पॉटबॉयशी बोलताना दिली. त्याने सांगितले की, माझ्या वडिलांची तब्येत सध्या स्थिर आहे पण ते आयसीयूत आहेत.

बप्पा लहरीने पुढे सांगितले की, बुधवारी त्यांना सौम्य कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांना आधीच फुफ्फुसांचा त्रास आहे, अशात त्यांची जास्त चिंता वाटत होती. ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. आम्ही त्यांना भेटू शकत नाही. त्यांच्यावर डॉ. उदवाडिया उपचार करत आहेत. त्यांची काळजी घेण्यात आल्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. ' बप्पा लहरीने पुढे म्हटले की, थोडे कठीण आहे कारण वडील एकटे असतात. आम्हाला त्यांना भेटण्याची परवानगी नाही. ते कधीच एकटे राहिले नाहीत. एकतर माझी आई किंवा आमच्यापैकी मी किंवा माझी बहिण रीमा नेहमी त्यांच्यासोबत असतात. 

रीमाने एक स्टेटमेंट जारी केल आहे. ‘बप्पी दा यांनी खूप काळजी घेतली. याऊपरही त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळलीत. वयोपरत्वे त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. ते लवकरच स्वस्थ होऊन घरी परततील. त्यांच्यासाठी प्रार्थना करणा-यांचे, त्यांच्यावर प्रेम करणा-यांचे आभार,’ असे रिमाने तिच्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झालीये. यात रणबीर कपूर, नीतू कपूर, संजय लीला भन्साळी, मनोज वाजपेयी, सिद्धांत चतुर्वेदी, कार्तिक आर्यन, आमिर खान, सतीश कौशिक आदींचा समावेश आहे.

टॅग्स :बप्पी लाहिरी