ऑनलाईन रिलीजने ताणले संबंध, ‘आयनॉक्स’चा संताप, ‘प्रोड्यूसर्स गिल्ड’चा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 11:49 AM2020-05-15T11:49:20+5:302020-05-15T11:50:29+5:30
थिएटर सिस्टिम अशी मोडीत काढू नका. नवे सिनेमे डिजिटलवर रिलीज करू नका, अशी विनंतीही आयनॉक्सने केलीय.
अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराणा यांचा ‘गुलाबो सिताबो’, विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ हे सिनेमे आता चित्रपटगृहांत नाही तर ऑनलाईन रिलीज होणार, हे स्पष्ट झाले आहे. हे दोन्ही सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. लॉकडाऊनमध्ये गेल्या दीड-दोन महिन्यांपासून लोकांना एकही नवा सिनेमा बघता आलेला नाही. त्यामुळे काही प्रेक्षक यामुळे खूश आहेत. पण दुसरीकडे आयनॉक्स थिएटर्स मात्र नाराज आहे. होय, आयनॉक्स थिएटर्सने एक पत्रक जारी करून याबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे.
लॉकडाऊनमुळे देशातील सगळी थिएटर्स बंद आहेत. ती कधी उघडतील आणि उघडली तरी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे पुन्हा आधीसारखे फिरकतील का? या चिंतेपोटी अनेक निर्माता-दिग्दर्शकांनी आपले काही आगामी सिनेमे डिजिटल रिलीज करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच आता हे सिनेमे चित्रपटगृहांत नाही तर थेट अॅमेझॉन प्राईम व अशा काही प्लॅटफॉर्मवर रिलीज होतील. गुलाबो सिताबो आणि शंकुतला देवी या सिनेमांनी तशी घोषणाही केली आहे. मेकर्सच्या याच निर्णयावर आयनॉक्स थिएटर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.
चित्रपटगृहांऐवजी नवे चित्रपट थेट ओटीटीवर रिलील करण्याचा निर्णय आमच्यासाठी अतिशय हताश व निराशाजनक आहे. प्रॉडक्शन हाऊसेसच्या या निर्णयाने चिंता व दहशत पसरली आहे. चित्रपटगृह आणि कंटेट निर्माण करणा-यांमध्ये कायम परस्परावर अंवलंबून राहिले आहेत. म्हणजे, एकाच्या कामाने दुस-याला लाभ होतो. ही भागीदारी अनेक दशकांपासून चालू आहे. पण या संकटाच्या काळात एकमेकांना सोबत करण्याऐवजी, स्वत:चा तेवढाच फायदा पाहण्याचे अनेकांचे धोरण आमची चिंता वाढवणारी आहे. या काळात एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज आहे. जेणेकरून फिल्म उद्योग पुन्हा ते सोनेरी दिवस पाहू शकेल. आम्ही कंटेट क्रिएटरला विनंती करतो की, थिएटर सिस्टिम अशी मोडीत काढू नका. नवे सिनेमे डिजिटलवर रिलीज करू नका, अशी विनंतीही आयनॉक्सने केलीय.
प्रोड्यूसर्स गिल्ड म्हणते,
आयनॉक्स थिएटर्सच्या या नाराजीवर उत्तर दिले आहे. प्रोड्यूसर्स गिल्ड म्हणते, सद्यस्थिती बघता मनोरंजन उद्योग मोठ्या आर्थिक संकटावरून जात आहे. या उद्योगावर अवलंबून असलेले हजारो कुटुंबांची अवस्था बिकट आहे. निर्मात्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. सिनेमागृहे बंद आहेत. ते सुरु झाल्यानंतरही लोक त्याकडे आधीसारखे फिरकतील, याची तूर्तास हमी देता येणार नाही. शिवाय थिएटर्स सुरु झाल्यानंतर तिथे सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्यावी लागणार आहे. याचा थेट परिणाम प्रेक्षक संख्येवर होणार आहे. या सगळ्यात निर्मात्यांना मोठे नुकसान सोसावे लागू शकते. थिएटर्स सुरु झालेच तर सर्वप्रथम तिथे मोठे सिनेमे रिलीज होतील. अशावेळी लहान बजेटच्या सिनेमांचे काय? या व अनेक गोष्टींचा विचार करून काही सिनेमे डिटीजल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थिएटर्स व सिनेमांचे नाते अतूट आहे. हे नाते टिकवून ठेवण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. पण सध्याची स्थिीत आणि वरील काही कारणांमुळे काही निर्णय घेणे भाग आहे, असे प्रोड्यूसर्स गिल्डने म्हटले आहे.