Join us

छोट्या पडद्यावर बबिता फोगट यांचा प्रेरणादायी प्रवास ‘दंगल’मध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 7:44 AM

पुरुषप्रधान समाजात रूढ समज मोडीत काढून भारतासाठी ऑलिम्पिक्स स्पर्धांमध्ये पदक जिंकणा-या गीता आणि बबिता फोगट यांची कथा ‘दंगल’ या ...

पुरुषप्रधान समाजात रूढ समज मोडीत काढून भारतासाठी ऑलिम्पिक्स स्पर्धांमध्ये पदक जिंकणा-या गीता आणि बबिता फोगट यांची कथा ‘दंगल’ या चित्रपटात सादर करण्यात आली आहे. आमीर खान प्रॉडक्शन्स, वॉल्ट डिस्ने पिक्चर्स आणि यूटीव्ही मोशन पिक्चर्स यांनी संयुक्तपणे निर्मिती केलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे.आमीर खानबरोबर लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री साक्षी तन्वर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.'दंगल' चित्रपटातील भूमिकेद्वारे झाहिरा वासिम, फातिमा सना शेख आणि अपारशक्ती खुराणा या कलाकारांनी हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले आहे. या दोन मुलींच्या अढळ निश्चयाच्या या थक्क करणाऱ्या चित्रपटाला चीन आणि हाँगकाँगसह जगभरात उदंड प्रतिसाद मिळाला. ‘ब्लॉकबस्टर मूव्ही चॅनल’ असलेल्या ‘झी सिनेमा’ वाहिनीवर या वीकेण्डला, रविवार, 20 मे रोजी दुपारी 12.00 वाजता या चित्रपटाचे प्रसारण केले जाईल.‘दंगल’ ही क्रीडा क्षेत्रातील एक यशोगाथा असून हरयाणातील एक पैलवान महावीरसिंह फोगट (आमीर खान) यांनी आपल्या गीता (फातिमा सना शेख) आणि बबिताकुमारी (सान्या मल्होत्रा) या दोन मुलींना चाकोरीबाहेर जाऊन कुस्तीचे प्रशिक्षण कसे दिले आणि या दोघींनी आपल्या वडिलांचा विश्वास सार्थ करीत भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक कसे जिंकले, त्याची रोमहर्षक कथा आहे. आपल्या मुलाने देशासाठी सुवर्णपदक मिळविले पाहिजे, असा ध्यास लागलेल्या महावीरसिंह फोगट या निवृत्त पैलवानाची भूमिका आमीर खानने अस्सल उभी केली आहे. यातून देण्यात आलेला संदेश अतिशय शक्तिशाली असून त्यात अरिजितसिंगच्या ‘नैना’ आणि रफ्तारचे ‘धाकड’ या गाण्यांनी तो अधिकच टोकदार केलाआहे.संसार चालविण्यासाठी कुस्ती खेळून पुरेसे पैसे मिळत नसल्याचे जाणविल्याने महावीर फोगट नाइलाजाने हरयाणातील आपल्या बळाली गावात येऊन नोकरी पत्करतो. देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे आपले स्वप्न भंगलेला महावीरलिंह फोगट हे स्वप्न आपल्या मुलांकडून पूर्ण करण्याचा निर्धार करतो. पण त्याची पत्नी दया (साक्षी तन्वर) चौथ्यांदा मुलीलाच जन्म देते आणि त्याचे हे स्वप्न पुन्हा अपूर्णच राहणार अशी चिन्हे दिसतात. पण एके दिवशी गीता (झाहिरा वासिम) आणि बबिता (सुहानी भटनागर) या त्याच्या दोन मुली एका मुलाची पिटाई करून घरी परतात, तेव्हा आपल्या मुलींमध्ये मल्लविद्येचे कौशल्य असल्याची जाणीव महावीरला होते. यानंतर या दोन मुलींना जागतिक पातळीवरील पैलवान करण्यासाठी महावीरसिंह जे अपार कष्ट घेतो आणि या मुलींकडून कठोर परिश्रम करून घेतो, त्याची फळे नंतर दिसू लागतात. या मुली जाहीर कुस्त्यांमधून त्यांच्या वयाच्या मुलांना चीतपट करतात. गीता (फातिमा सना शेख) आणि बबिताकुमारी (सान्या मल्होत्रा) या मुली तरूणपणी कुस्त्यांमध्ये राष्ट्रीय पातळीवर नाव कमावतात.पण कुस्तीत देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे आपल्या वडिलांचे स्वप्न या मुली पूर्ण करू शकतात का? की मानवी भावनांच्या आहारी जाऊन त्या आपल्या पित्याचे स्वप्न अपुरेच ठेवतात?अशा सगळ्या गोष्टी रसिकांना छोट्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.