रविवारी कोलकाता नाईटराईडर्स आणि सनराइजर्स हैद्राबाद यामध्ये झालेला सामना चांगलाच अटीतटीचा झाला. या सामन्यात सनराईजर्स हैद्राबाद हा संघ विजेता ठरला. आपल्या टीमने केलेल्या अप्रतिम कामगिरीसाठी या टीमचे फॅन्स प्रचंड खूश होते. आपल्या टीमला प्रत्येकजण पाठिंबा देत त्यांचे मनोबल वाढवत होते. पण याच दरम्यान कॉर्पोरेट बॉक्स मध्ये काही वेगळीच गोष्ट सुरू होती आणि ही सगळी गोष्ट कॅमेरात कैद झाली आहे.
कॉर्पोरेट बॉक्स मध्ये बसेलेले सहा जण ही मॅच पाहाताना दारू पिऊन हंगामा करत होते. संतोष नावाच्या एका व्यक्तीने या सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. कॉर्पोरेट बॉक्स मध्ये बसलेल्या या सहा जणांमध्ये तेलगू अभिनत्री प्रशांतीचा देखील समावेश आहे. प्रशांती ही तेलगू टेलिव्हिजनवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिच्या अनेक मालिका गाजल्या आहेत. संतोषने दाखल केलेल्या तक्रारीनंतर प्रशांती आणि तिच्या मित्रांवर पोलिसांनी केस दाखल केली आहे. प्रशांती आणि तिचे मित्र मॅच पाहायला आलेल्या लोकांना प्रचंड त्रास देत होते. संतोषने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रशांती आणि तिचे काही मित्र मॅच पाहाताना सगळ्यांना त्रास देत होते. मी त्यांना शांत बसायला सांगितल्यानंतर त्यांनी मला धमकी दिली.
राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर असलेल्या सीसीटिव्हीमध्ये या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत प्रशांती आणि तिचे मित्र किती त्रास देत आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओत दिसून येत आहे की, प्रशांती आपल्या टीमच्या चांगल्या परफॉर्मन्सनंतर आनंदाने नाचत आहे. एवढेच नव्हे तर ती समोर असलेल्या व्यक्तीवर उडी मारताना दिसत आहे. ही व्यक्ती तिचाच मित्र असल्याचे म्हटले जात आहे.
संतोषने प्रशांती आणि तिच्या मित्रांच्या विरोधात दिलेल्या या तक्रारीनंतर कलम 341, 188, 506 अंतर्गत या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.