आयपीएल 2022 (IPL 2022) सुरु होण्याआधी, बंगळुरूमध्ये खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR)मालक शाहरुख खान (Shah Rukh Khan) या लिलावात सहभागी नाही झाला आहे. गेल्या सीझनमध्ये त्यांचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. पहिल्या टप्प्यातील संघाची कामगिरी काही खास नसली तरी दुसऱ्या टप्प्यात त्यांनी शानदार खेळ दाखवत अंतिम फेरी गाठली. पण गेले वर्ष शाहरुखसाठी खडतर होते. त्यांचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी तुरुंगात जावे लागले होते.
आर्यन खान (23) याला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने कथित ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. एनसीबीने क्रूझवर सुरु असलेल्या पार्टीवर छापा टाकल्यानंतर काही तासांनंतर त्याला ताब्यात घेतले. आर्यन जवळपास तीन आठवडे मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये होता. या घटनेनंतर आर्यन कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा ठिकाणी दिसला नाही, पण तो आयपीएल 2022 च्या लिलावात दिसत आहे. लिलावापूर्वीच्या ब्रीफिंगमध्येही तो सहभागी झाला होता.
शनिवारच्या लिलावाच्या एक दिवस आधी, आर्यन खान आणि सुहाना खान (Suhana Khan) देखील प्री-आयपीएल लिलावाच्या ब्रीफिंग दरम्यान केकेआरच्या टेबलवर दिसले होते. केकेआरच्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्यांचे फोटो शेअर करण्यात आला आहे. आर्यनने मागच्या वर्षीही लिलावात भाग घेतला होता, पण सुहाना पहिल्यांदाच लिलावात सहभागी होत आहे. गेल्या वर्षी जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहताही लिलावाच्या टेबलावर होती. केकेआरच्या टीममध्ये बॉलीवूड अभिनेत्री जुहीचेही मालकी हक्क आहेत.