या दिवशी झी क्लासिक वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार इक्बाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 9:18 AM
सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या इक्बाल या मूक-बधीर तरुणाला क्रिकेटची प्रचंड आवड असते. त्याचे वडील त्याला क्रिकेटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ...
सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या इक्बाल या मूक-बधीर तरुणाला क्रिकेटची प्रचंड आवड असते. त्याचे वडील त्याला क्रिकेटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचे मूक-बधीरपणही क्रिकेटपटू बनण्याच्या त्याच्या स्वप्नाच्या आड येत असते. पण तो एका माजी क्रिकेटपटूला आपला गुरू बनवितो. श्रेयस तळपदे या मराठी अभिनेत्याने इक्बाल चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते आणि या चित्रपटात नासिरुद्दिन शहा आणि श्वेता प्रसाद यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती सुभाष घई यांची असून नागेश कुकुनूर यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. आता आपल्या ‘वो जमाना, करें दीवाना’ या ध्येयधोरणानुसार ‘झी क्लासिक’ वाहिनीवर शुक्रवार, ४ मे रोजी रात्री दहा वाजता ‘इंडियाज फायनेस्ट फिल्म्स’ या मालिकेत ‘इक्बाल’चे प्रसारण केले जाणार आहे.भारतात क्रिकेट हा निव्वळ खेळ राहिला नसून तो अनेकांचा धर्मच बनला आहे. तरीही काही लोक असे आहेत की, ज्यांना हा खेळ अजिबात आवडत नाही. अन्वर खान (यतिन कार्येकर) हा गरीब शेतकरी अशाच अल्पसंख्य क्रिकेटद्वेषी व्यक्तींपैकी असला, तरी त्याची पत्नी सईदा (प्रतीक्षा लोणकर) हिला मात्र क्रिकेटचे वेड असते. तिचे गर्भारपणाचे दिवस भरत आलेले असतात. साऱ्या गावाबरोबर एक क्रिकेटचा सामना पाहतानाच तिला प्रसूतीवेदना सुरू होतात आणि छोट्या इक्बालचा (श्रेयस तळपदे) जन्म होतो. जन्मत:च मूक-बधीर असलेला इक्बाल आपल्या गुरुजींकडे (गिरीश कर्नाड) क्रिकेटपटू होण्याची इच्छा प्रकट करतो. गुरुजींचे स्वत:च्या मालकीचे एक क्रीडासंकुल असते. तिथे ते त्याला क्रिकेट शिकवतात, पण लवकरच त्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आणि इक्बाल यांच्यात भांडण होते, तेव्हा इक्बालला ते संकुल सोडावे लागते. एकेकाळी क्रिकेट सामने खेळलेला, पण आता मद्याच्या आहारी गेलेला मोहित (नासिरुद्दिन शहा) हाच इक्बालचा शेवटचा आसरा ठरतो. मोहित इक्बालला आपले स्वप्न पूर्ण करण्यास मदत करतो की नाही याचे उत्तर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहिल्यावरच मिळेल. इक्बाल या चित्रपटाला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या चित्रपटाला आणि या चित्रपटातील भूमिकेसाठी नसुरुद्दीन शहा यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. Also Read : जाणून घ्या श्रेयस आणि दीप्तीच्या प्रेमाची गोष्ट!