Join us

घट्ट पॅंट घातली म्हणून अभिनेत्रीला नेलं पकडून, पुढे जे घडलं ते ऐकून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 5:43 PM

इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून 'हिजाब'वरुन जोरदार वाद पेटला आहे. हिबाज व्यवस्थित घातला नाही त्यामुळे इराण पोलिसांनी २२ वर्षीय तरुणीला अटक केली होती.

इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून 'हिजाब'वरुन जोरदार वाद पेटला आहे. हिबाज व्यवस्थित घातला नाही त्यामुळे इराण पोलिसांनी २२ वर्षीय तरुणीला अटक केली होती. पोलीस कोठडीत या तरुणीचा मृत्यू झाल्यामुळे महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आणि रस्त्यावर उतरुन निदर्शनं सुरू झाली. हे प्रकरण ताजं असतानाच आता इराणमध्ये वास्तव्याला असणारी बॉलीवूड अभिनेत्री एलनाज नौरोजी हिनं इराणची पोलखोल केली. 

अभिनेत्री एलनाज नौरोजीचं संपूर्ण कुटुंब इराणमध्ये वास्तव्याला आहे. पण इराणमध्ये होत असलेल्या निदर्शनानंतर त्यांना आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधता आलेला नाही. अभिनेत्री एलनाज आपल्या कुटुंबीयांप्रती अत्यंत चिंतेत आहे. तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत इराणची पोलखोल केली आहे. इराणमध्ये कशा पद्धतीनं लोकांवर अत्याचार केले जातात याची माहिती दिली आहे. 

घट्ट पँट परिधान केली म्हणून पोलिसांनी पकडलंइराण पोलिसांच्या जाचाला आपल्यालाही सामोरं जावं लागलं होतं याचा खुलासा एलनाजनं केला आहे. एलनाज जेव्हा इराणमध्ये वास्तव्याला होती तेव्हा ती देखील पोलिसांच्या जाळ्यातून कशीबशी सुटली होती. त्या धक्कादायक प्रसंगाची माहिती तिनं एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. "महसा अमिनीसोबत घे घडलं ते माझ्याही सोबत घडलं असतं. काही वर्षांपूर्वी मी इराणमध्ये होते. तेहरानमध्ये माझा शेवटचा दिवस होता. मी माझ्या चुलत भावासोबत बाहेर फिरत होते तेव्हा अचानक एक महिला माझ्यासमोर आली आणि हे काय आहे? असं विचारू लागली. ती नेमकं काय विचारत आहे हेच मला कळलं नाही. तिनं पुन्हा मला 'हे काय आहे?' असं विचारलं. त्यानंतर तिथल्या स्वयंघोषित पोलीस असलेल्या गश्त-ए-इरशाद यांनी मला फक्त यासाठी पकडलं कारण मी घट्ट पँट घातली होती", असं एलनाजनं सांगितलं. 

"मी घातलेल्या पँटमुळे अंगप्रदर्शन होत आहे. म्हणजेच माझ्या शरीराचा आकार त्यातून दिसत आहे असं त्यांचं म्हणणं होतं. मला तेव्हा पोलीस व्हॅनमध्ये बसवून री-एज्युकेशन सेंटरमध्ये नेण्यात आलं. हीच ती जागा तिथं मृत महसा अमिनीला नेण्यात आलं होतं. जोवर माझ्यासाठी कुणी सैल कपडे घेऊन येत नाही तोवर मला तिथं बसवून ठेवण्यात आलं होतं", असं एलनाज म्हणाली. 

''जेव्हा मी तिकडे पोहोचले तेव्हा त्यांनी माझा फोन आणि पासपोर्ट माझ्याकडून काढून घेतला. ते लोक ज्यापद्धतीनं घाबरवतात, जसं चुकीचं वर्तन करतात, हे सगळं सहन करत ईराणमध्ये कुणीच राहू शकत नाही. कारण तिकडचे पोलीस काहीही कारण नसताना किंवा कुठल्याही वायफळ कारणासाठी पकडून नेतात. ते महिलांच्या नखांना लावलेली नेलपेंट, कपडे, हिजाब अशा गोष्टींवरुनही पकडून नेतात'', अशी पोलखोल एलनाज हिनं केली आहे. इतकंच नव्हे, तर ते लोक महिलांची सर्व माहिती घेतात. नेमकं कधी आणि कोणत्या कारणावरुन आपल्याला पकडून नेलं जाईल याची काहीच कल्पना नाही. ज्या महिला आणि मुलांना पकडून नेलं जातं त्या बऱ्याचदा परतत देखील नाहीत, असंही तिनं सांगितलं. 

एलनाज हिनं आपल्या व्हिडिओमध्ये इराणी पोलिसांचा सगळा कारभार उघड केला आहे. इराणमध्ये महिलांना कशा वाईट पद्धतीनं वागणूक दिली जाते याचा गौप्यस्फोट तिनं केला आहे. तिनं केलेले आरोप धक्कादायक तर आहेतच पण इराणला अडचणीत आणणारे देखील आहेत. इराण महिलांसाठी अजिबात सुरक्षित नाही असा दावा तिनं केला आहे. लोकांनी एकत्र येऊन तेथील महिलांची मदत केली पाहिजे आणि त्यांचे हक्क त्यांना परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं आवाहनही तिनं केलं आहे. 

टॅग्स :इराणबॉलिवूड