ठळक मुद्देगतवर्षी इरफानला न्युरो एंडोक्राइन ट्युमर या आजाराचे निदान झाले होते. यानंतर तो लंडनमध्ये उपचारासाठी रवाना झाला होता.
न्यूरो एंडोक्राइन ट्युमरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असलेला अभिनेता इरफान खान नुकताच मुंबई विमानतळावर दिसला. पण व्हिलचेअरवर. कुणी फोटो टिपू नये यासाठी त्याने आपला चेहरा स्कार्फने झाकला होता. तसेच त्याने डोक्यावर टोपी घातली होती. इरफान चालत न येता व्हिलचेअरवर दिसल्याने चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. अनेक चाहत्यांनी इरफानच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. व्हिलचेअरवरचे त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इरफानला व्हिलचेअरचा आधार का घ्यावा लागला, याचे कारण आता समोर आले आहे. त्याच्या प्रवक्त्याने याबद्दल खुलासा केला आहे. होय,‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाचे शूटींग पूर्ण केल्यानंतर नुकतीच इरफानवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
‘लंडनमधील शूट संपल्यानंतर इरफानला घरी परतायचे होते. तो काही दिवस मुंबईत राहणार आहे. इरफानच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल आभार. पण त्याच्या तब्येतीबद्दल कुठलीही चुकीची माहिती पसरवू नका,’ असे त्याच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
गतवर्षी इरफानला न्युरो एंडोक्राइन ट्युमर या आजाराचे निदान झाले होते. यानंतर तो लंडनमध्ये उपचारासाठी रवाना झाला होता. या उपचारानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’चे शूटींग सुरू केले होते. हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झालेला हिंदी मीडियम चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटाचे अंग्रेजी मीडियम चित्रपटात मिठाईच्या दुकानाचा मालक असलेल्या चंपकजीच्या भूमिकेत इरफान दिसणार आहे.
अंग्रेजी मीडियम चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान करत असून दिग्दर्शन होमी अदाजानिया करत आहेत. या चित्रपटात इरफानसोबत दीपक डोबरियाल व राधिका मदान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या कलाकारांसोबत पंकज त्रिपाठी या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे.