Join us

‘या’ धमाकेदार बायोपिकमधून होणार इरफान खानची वापसी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2018 7:57 PM

इरफान खानच्या वापसीकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, लंडनमध्ये कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचार घेत असलेला इरफान लवकरात लवकर कामावर परतू इच्छितो. 

इरफान खानच्या वापसीकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, लंडनमध्ये कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचार घेत असलेला इरफान लवकरात लवकर कामावर परतू इच्छितो. त्याच्या प्रकृती वेगाने सुधारणा होतेय आणि त्यामुळे इरफानच्या वापसीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दिग्दर्शकही त्याच्यासोबत काम करण्यासाठी तितकेच उत्सूक आहेत.ताज्या बातमीनुसार, इरफान खान लवकरच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक शुजीत सरकारसोबत आपला नवा प्रोजेक्ट सुरू करू शकतो. शूजीत सरकार यांच्या डोक्यात दीर्घकाळापासून एक कथा घोळत आहे. क्रांतिकारी उधम सिंह यांच्या बायोपिकवर शूजीत यांना चित्रपट बनवायचा आहे. या चित्रपटासंदर्भात इरफानसोबत शूजीत यांची चर्चाही झाली होती. वर्षभरापूर्वीच इरफानने या चित्रपटासाठी होकार दिला होता. पण याचदरम्यान इरफानच्या आजाराचे निदान झाले आणि तो लंडनला उपचारासाठी रवाना झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वापसीनंतर इरफान सर्वप्रथम शूजीत यांच्या या चित्रपटाचे शूटींग सुरू करेल. खुद्द शूजीत यांनी याबाबत खुलासा केला. इरफान कधी परतणार, याकडे संपूर्ण इंडस्ट्रीचे लक्ष लागले आहे. इरफान इंडस्ट्रीतील शानदार अभिनेत्यांपैकी एक आहे. पूर्णपणे बरे होऊन त्याने परत कामास सुरूवात करावी, ही माझी इच्छा आहे. तो परतेपर्यंत मी माझ्या चित्रपटाची तयारी पूर्ण करून ठेवणार आहे, असे शूजीत यांनी सांगितले.मध्यंतरी या चित्रपटासाठी शूजीत यांनी रणबीर कपूरसोबत चर्चा केल्याचीही बातमी होती. पण त्यावेळी रणबीर ‘संजू’मध्ये बिझी असल्याने त्याने शूजीत यांना होकार दिला नव्हता. दरम्यान इरफान ‘हिंदी मीडियम’च्या सीक्वलमध्ये दिसणार असल्याची खबर आहे.

इरफान खान एंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराने पीडित आहे. इरफानवर सध्या लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. इरफानने आपल्या आजाराबाबत ट्विटर अकाऊंटवरुन खुलासा केला होता. काही महिन्यांपूर्वी इरफानने एक सावलीचा फोटो शेअर केला होता त्यासोबत एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. 

 

टॅग्स :इरफान खान